*कोंकण एक्सप्रेस*
*नरडवे इंग्लिश स्कूलच्या भव्य नूतन इमारतीचा उद्या लोकार्पण; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
नरडवे इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते शनिवारी सकाळी ११ वाजता या उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबईचे अध्यक्ष जे. वाय. सावंत यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य नरडवे गावात, पंचक्रोशीतील ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे पवित्र कार्य ‘नरडवे इंग्लिश स्कूल’च्या माध्यमातून गेली ७० वर्षे अखंडपणे सुरू आहे. अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित या शाळेने ग्रामीण भागातील पिढ्यान्पिढ्या घडवण्याचे ज्ञानदानाचे कार्य व्रत म्हणून जोपासले आहे. या शाळेची मूळ इमारत मातीची असल्याने ती पूर्णपणे जीर्ण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन साल २०१९ मध्ये अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबईच्या कार्यकारिणीने या इमारतीचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि प्रत्यक्ष पुनर्निर्माण कार्यास सुरुवात केली.
या नूतन वास्तूच्या उभारणीत शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, हितचिंतक आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली आहे. सर्वांच्या सामूहिक योगदानातून आणि दातृत्वातून आज ही देखणी वास्तू दिमाखात उभी राहिली आहे.
ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात उभी राहिलेली ही नूतन वास्तू नरडवे पंचक्रोशीच्या शैक्षणिक प्रगतीत मैलाचा दगड ठरणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्व माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि इमारत बांधकामासाठी आर्थिक व मोलाचे सहकार्य केलेल्या सर्व मान्यवर दात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

