*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली शहरात ४०० रूपयांची घरपट्टी होणार ४ हजार*
*नगरपंचायत सभेत प्रशासनाची माहिती पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश*
*कणकवली: संजना हळदिवे*
कणकवली शहरातील जुन्या घरांना ग्रामपंचायत दरानुसार घरपट्टीची आकारणी होत आहे. एक हजार चौरस फुटांच्या जुन्या घरांसाठी सध्या चारशे रूपये घरपट्टी आकारली जाते. मात्र नगरपंचायत क्षेत्रात नगरपंचायतीच्या नियमानुसारच घरपट्टी आकारणीचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ही घरपट्टी ४ हजार रूपये होणार असल्याची माहिती नगरपंचायत सभेत देण्यात आली.
जुन्या घरांना अचानक तब्बल दहा पटीने घरपट्टी वाढवली तर लोक नगरपंचायतीवर मोर्चा काढतील. त्यामुळे किती घरांना, किती प्रमाणात घरपट्टी वाढ होणार त्याचा संपूर्ण तपशील पुढील नगरपंचायत सभेत सादर करा. त्यानंतरच या वाढीव घरपट्टीबाबत निर्णय घेऊ असे निर्देश नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले.
कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात आज नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यात उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह इतर नगरसेवक, नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील घरपट्टीबाबत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी विवेचन केले. कणकवली शहरात ५ हजार ७०० ही नगरपंचायत स्थापनेनंतरची नवीन बांधकामे आहेत. या बांधकामांना नवीन दरानुसार घरपट्टीची आकारणी होत आहे. तर २ हजार ५०० ही जुनी घरे आहेत. या घरांना ग्रामपंचायत धर्तीवर घरपट्टी आकारणी केली जात आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार नगरपंचायत क्षेत्रातील सर्व बांधकामांना समान दरानुसार घरपट्टीची आकारणी केली जात आहे. जुन्या घरांना सन २००३ पासून जुन्याच दराने घरपट्टी आकारली जातेय. मात्र या घरांना आता सवलत मिळणार नाही. सर्व बांधकामे ऑनलाईन करून सर्वांना समान टॅक्स अाकारला जावा असे प्रशासनाकडून निर्देश आहेत. याबाबत दिरंगाई झाली तर माझ्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे नगरपंचायत सभागृहाने ‘समान बांधकाम समान घरपट्टी’ बाबत निर्णय घ्यावा असे मुख्याधिकारी पाटील म्हणाल्या.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी वाढीव घरपट्टीला आक्षेप घेतला. यापूर्वी नगरपंचायतीवर तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्यावेळी तुम्ही घरपट्टी वाढवली नाही. आता आमची सत्ता आल्यावर तुम्ही हा निर्णय घेतलात तर, “पारकरांची सत्ता आली आणि घरपट्टी वाढली’ असा मैसेज शहरवासीयांमध्ये जाऊ शकतो. दुसरी बाब म्हणजे शहर विकासाच्या अनुषंगाने अनेक फाईल आपल्या कार्यालयात पडून आहेत.. त्यावर निर्णय घेत नसल्याबाबत तुम्हाला तुमचे वरिष्ठ विचारत नाहीत. मात्र घरपट्टी वाढविण्याच्या विषयावर तुम्ही लगेच अॅक्शन मोडवर येता हे योग्य नाही असे सुनावले.
पारकर म्हणाले, कणकवली शहरात पन्नास वषर्षापेक्षा अनेक जुनी घरे आहेत. या घरांवर चारशे ते पाचशे रूपये घरपट्टीची आकारणी होत आहे. या घरांना अचानक चार ते पाच हजार रूपये घरपट्टी आकारणी झाली तर जनप्रक्षोभ होऊ शकतो. त्यामुळे आजच्या सभेत तातडीने यावर निर्णय होणार नाही. किती घरांची घरपट्टी किती प्रमाणात वाढत आहे, त्याबाबतचा सविस्तर तपशील सभागृहाला सादर करा. त्यानंतरच सर्वानुमते आम्ही निर्णय घेऊ.
बंडू हर्णे यांनीही अचानक घरपट्टी वाढविणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. जर सभागृहाने घरपट्टी वाढवू नये असा निर्णय घेतला. तर प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल असा प्रश्न देखील हर्णे यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी, सभागृहाच्या निर्णयाची माहिती तथा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला जाईल. सभागृहाचा निर्णय चुकीचा असेल तर जिल्हाधिकारी आपल्या पातळीवर निर्णय घेतील असे उत्तर दिले. यावर बंडू हर्णे म्हणाले की, नगरपंचायत सभांमध्ये प्रशासनाला मान्य नसणारे अनेक ठराव देखील यापूर्वी घेण्यात आले आहेत. त्याबाबतचे किती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यावर जिल्हाधिकारी पातळीवर काय कारवाई झाली? असा प्रश्न केला. यावर नगराध्यक्ष श्री. पारकर यांनी हा वाद नको असे सांगत, अचानक घरपट्टी वाढविण्याचा ठराव आम्ही अाता घेणार नाही. घरपट्टीबाबतची सविस्तर माहिती द्या. त्यानंतरच पुढच्या सभेत काय ते बघू असे स्पष्ट केले.

