राष्ट्र सेवा दल शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात – संदीप परब

राष्ट्र सेवा दल शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात – संदीप परब

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्र सेवा दल शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात – संदीप परब*

*अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचे उदघाटन संपन्न*

*कणकवली ः संजना हळदिवे*

खरा तो एकचि धर्म …जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजी लिखित प्रार्थनेतील भावनांची आज समाजाला नितांत गरज आहे. बालवयातच मानवता धर्म आणि राष्ट्रप्रेमाची भावना राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून मुलांच्या मनावर बिंबवली जाते.

युवकांकडे प्रचंड ऊर्जा आहे, राष्ट्र सेवा दलाचे हे शिबिर म्हणजे भारत देशाच्या भावी पिढीतील ऊर्जेला योग्य दिशा देणारे व्यासपीठ आहे. इथे मिळणारे प्रशिक्षण केवळ व्यक्तिमत्व विकासापुरते मर्यादित नसून, ते एक जबाबदार नागरिक घडवण्याचे काम करते. अद्वैत फाऊंडेशनच्या वतीने सलग 9 वर्षे घेतले जाणारा विधायक समाज घडविणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन संविता आश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी केले. अद्वैत फाऊंडेशन कणकवली च्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे 3 मे ते 7 मे दरम्यान आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्त्व विकास निवासी शिबीराच्या उदघाटन प्रसंगी परब बोलत होते. शिबिराचे उदघाटन संदीप परब यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गोपुरी चे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव बाळू मेस्त्री, वात्सल्य मंदिर ओणी चे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन गुजर, अद्वैत फाउंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, कणकवली तालुका पत्रकार संघाचे सचिव संजय सावंत, प्रशिक्षक शहाजी गोंगाणे, चंदन माटुंगे, बिसना थापा, श्रावणी कुडाळी उपस्थित होते. यावेळी

बोलताना प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले की, राष्ट्र सेवा दलाचे शिबीर म्हणजे माणसातील माणूसपण जिवंत करणारी कार्यशाळा असते.राष्ट्रप्रेमाची शिकवण देतानाच सुजाण आणि मानवता धर्म जगणारी आणि जोपासणारी भावी पिढी या शिबिरातून घडते. माणूस म्हणून जगताना आयुष्यात समाधानी राहण्याचे कसब सुद्धा या शिबिरातून शिकायला मिळते. डॉ महेंद्र गुजर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ” शिस्त, संघटन आणि सेवाभाव ही राष्ट्र सेवा दलाची ओळख आहे. या शिबिरातून मुलांना केवळ ज्ञानच नाही, तर जीवन जगण्याची योग्य दृष्टी मिळेल. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे.” या शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच मुंबई आणि गोवा राज्यातील शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनिषा पाटील यांनी केले तर आभार सरिता पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!