*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळच्या संचालक पदी कोकण विभागातून तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती*
*कणकवली : संजना हळदिवे*
पणन मंडळ संचालक पदी निवड झाल्याबद्दल तुळशीदास रावराणे यांचे अभिनंदन करताना पालकमंत्री नितेश राणे, सोबत योगेश सावंत, बंडू ठाकूर.
कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी निवड करण्यात आली आहे. कोकण महसूली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल तुळशीदास रावराणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वतंत्र मार्केट यार्ड नसतानाही तुळशीदास रावराणे यांनी पुढाकार घेत खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन खरेदी करून आधुनिक मार्केट यार्ड उभारणीस प्रारंभ केला. सध्या या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून बाजार व्यवस्थेत मोठा बदल घडविण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच बाजार समिती व कृषी क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या विविध शेतकरी हिताच्या उपक्रमांची शासन स्तरावरून दखल घेण्यात आली आहे.
याच कार्याची दखल घेत खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे कोकण विभागातून रिक्त असलेल्या कृषी पणन मंडळावर संचालक पदासाठी शिफारस केली होती. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन)अधिनियम १९६३ च्या कलम ३९(ब) नुसार राज्य शासनाने कोकण महसुली विभागातून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर सदस्य म्हणून तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती शासन स्तरावरून केली आहे. नुकताच त्याबाबतचा शासन निर्णय झाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची रचना पुढीलप्रमाणे आहे. पणनमंत्री, महाराष्ट्र राज्य हे या पणन मंडळाचे अध्यक्ष असून राज्यमंत्री पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. तर सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे हे पदसिद्ध सदस्य असतील. तसेच राष्ट्रीय कृषी व ग्रामविकास बँकेचा (नाबार्ड) नामनिर्देशित प्रतिनिधी, भारत सरकारचा कृषी उत्पन्न खरेदी-विक्री सल्लागार हे सदस्य, राज्यातील सहा महसूल विभागांतून प्रत्येकी एक अशा बाजार समिती सभापतींपैकी नामनिर्देशित सहा सदस्य व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे चे अध्यक्ष सदस्य संचालक, कृषी उत्पन्न खरेदी-विक्री महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य असतील. तसेच व्यवस्थापकीय संचालक पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य हे सचिव असतील. अशा या महत्त्वपूर्ण मंडळामध्ये कोकण विभागातून तुळशीदास रावराणे यांची निवड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील शेतकरी, बागायतदार व बाजार व्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामध्ये संचालक पदी नियुक्तीबद्दल खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व पणनमंत्री जयकुमार रावल तसेच सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक यांचे तुळशीदास रावराणे यांनी आभार मानले आहेत.
बॉक्स
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न करणार – तुळशीदास रावराणे
राज्य कृषी पणन मंडळावर सदस्यपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना तुळशीदास रावराणे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळ यामध्ये समन्वय साधत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला अधिकाधिक मार्केट मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी या माध्यमातून चांगले काम केले जाईल अशी ग्वाही तुळशीदास रावराणे यांनी दिली.

