कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे – पालकमंत्री नितेश राणे*

*कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा *
*दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवचन*

*कणकवली : सौ संजना हळदिवे*

आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया – युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे. वाचक म्हणून आणि एक राजकीय पक्षाचा समाजात काम करणारा कार्यकर्ता म्हणून तर माझ्या दृष्टीने सर्वात जास्त विश्वासार्हता म्हणून पत्रकारिता ही वृत्तपत्रांची आहे. पत्रकारितेत आपले सिध्दांत बाजूला ठेवू नका. कणकवली तालुक्यातील पत्रकारसंघाचे कार्य उल्लेखनीय आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व त्यांची टीम विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवित आहे. पत्रकार म्हणून ब-याच पत्रकारांचा नेहमी आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. वृत्तपत्रात सर्वात जास्त विश्वासार्हता असलेली पत्रकारिता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दर तीन महिन्याला विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले जाईल. तसेच ओऱोस येथे दर्पण गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी घरे माफक दरात उपलब्ध केली जातील, अशी घोषणा मत्स्य व बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.

कणकवली येथील स्वामी विवेकानंद सभागृह येथे कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर , सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनु सावंत , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर , परिषद प्रतिनीधी गणेश जेठे , माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत , तालुकाध्यक्ष भगवान लोके , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ , जिल्हा प्रतिनीधी लक्ष्मीकांत भावे , सचिव संजय सावंत तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, संतोष वायंगणकर, रमेश जोगळे , माजी तालुकाध्यक्ष अजित सावंत, दिगंबर वालावलकर , उपाध्यक्ष उमेश बुचडे , सचिन राणे, उपाध्यक्ष नितीन कदम, नंदू कोरगांवकर, खजिनदार रोशन तांबे , सुधीर राणे , राजेश सरकारे,दर्शन सावंत माजी जि.प.सदस्य संजय देसाई , बंडू हर्णे , मिलींद मेस्त्री , बॅंक संचालक समीर सावंत , शहराध्यक्ष अण्णा कोदे , रंजिता तहसिलदार , अस्मिता गिडाळे , उल्का तावडे, तुषार हजारे , योगेश गोडवे , विशाल रेवडेकर, महेश सावंत , किशोर राणे , मिलींद पारकर , विरेंद्र चिंदरकर , नितीन सावंत, दिलीप हिंदळेकर, भाई चव्हाण , चंद्रशेखर तांबट आदींसह पत्रकार मित्र उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय माळवदे, ज्येष्ठ पत्रकार कै. शशी तायशेट्ये उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर देसाई , कै. अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष पाटणकर तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रथमेश जाधव, यशस्वी उद्योजक पुरस्कार संदीप चौकेकर , सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उत्तम पुजारे ,वृत्तपत्र कर्मचारी सन्मान पुरस्कार भास्कर रासम यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे ( कणकवली ) , अरविंद मुद्राळे ( तळेरे ) , बाळा फोंडके ( फोंडाघाट ), खारेपाटण येथील कै. सौ. विना राजेंद्र ब्रह्मदंडे यांच्या मरणोत्तर अवयव दानाने जवळपास सहा अवयव उपयोगात येऊन दुसऱ्यांना नवीन आयुष्य दिल्याबद्दल पती राजेंद्र ब्रह्मदंडे, दर्पण गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष राऊळ यांचा विशेष सन्मान पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आला.
मंत्री नितेश राणे म्हणाले , कणकवली पत्रकार संघाने ज्यांना पुरस्कार दिले. त्या योग्य व्यक्तींची निवड झालेली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. वैयक्तिक हितासाठी आपला सिध्दांत केव्हा केव्हा बाजूला ठेवतो का ? याचा विचार आपण केला पाहिजे. वाचकांच्या मतांमध्ये परिवर्तन झाले पाहिजे असे लिखान दर्पण मधून तेव्हाच्या व्यवस्थेत स्वातंत्र्यासाठी बाळशास्त्री जांभेकर करत होते. आपल्याला समाज बदलण्याची ताकद पत्रकारितेत आहे. समाजामध्ये मस्तावलेल्या , झोपलेल्या व्यस्थेला जागे करण्याचे काम तुम्ही करता, समाजाला प्रबोधन करण्याचे काम तुम्ही करता, त्यामुळे पत्रकारितेच्या माध्यमातून पुढील 25 ते 50 वर्षाचा आकार समाजाला मिळणार आहे. क्षणिक फायद्याच्या मागे न लागता पत्रकारांनी बातमीदारी करावी. पत्रकारिता करताना परिपूर्ण माहिती घेवून बातमी करा. पत्रकारितेचा दर्जा वाढवण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा. तरच सिंधुदुर्गचे भवितव्य उज्वल असेल.
आपल्या कमी वेळ देत पत्रकारीचे जबाबदारी पत्रकार पार पाडत असतात.पालकमंत्री म्हणून तुमच्यापेक्षा तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी म्हणून गृहनिर्माण प्रकल्प केला जात आहे. धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. मी पुढाकार घेतो. दर तीन महिन्यांनी जिल्ह‌्यातील पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेतले जाईल , अशी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.

सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या , आपल्या जीवनात आपल्या प्रिंट मीडियापासून आज इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यंत हा प्रवास पुढे जात आहे .अगदी आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्या मोबाईल वरती वेगवेगळ्या बातम्या येत असतात. तरीसुद्धा वर्तमानपत्र वाचने आवश्यक असते. समाजातील विविध प्रश्न माध्यमातून पुढे येत असतात. आपल्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या बरोबर च पुरवण्या असतात . लहानपणापासून त्याच्यामध्ये अनेक प्रकारची माहिती म्हणजे वाचनाची आवड लागण्यासाठी एक माध्यम आहे. समाजामध्ये घडणाऱ्या घटना , वाईट प्रवृत्ती असेल तर ती बातमी समाजप्रबोधनासाठी आवश्यक असते. पत्रकारांमधील संवेदनशीलता हीच एक सामाजिक बांधिलकी आहे.

नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले , कणकवली तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जोपासून काम करत आहे. पत्रकार मित्र आणि आमचे नेहमी मित्रत्वाचे संबंध राहिलेले आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे येथील समस्यांवर चांगले काम करत आहेत. उपजिल्हा रुग्णालय आरोग्य समस्या , टोलमुक्ती यासह विविध निवेदने त्यांना दिले. तरुण वयातच सत्तेचे अधिकार त्यांना मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाला अधिक मदत होईल. पत्रकार व्यक्तिमत्व घडवण्याचं काम करतात. जिल्ह्यातल्या जनतेच्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानाकोपऱ्यापर्यंत आमच्या बातम्या पोचवण्याचे काम पत्रकार करतात.
जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर म्हणाले , कणकवली तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पत्रकार संघ आहे. अध्यक्ष भगवान लोके आणि त्यांचे सहकारी चांगले काम करत आहेत. जिल्हा आणि तालुका पत्रकार संघामध्ये चांगले समन्वय आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ओरोस मध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे.

गणेश जेठे म्हणाले, आमच्या पत्रकारांमध्ये थोडाफार प्रमाणात कार्यकर्ता दडलेला असतो .कदाचित राजकारण्यांसोबत कायम राहिल्यामुळे ते झालं असेल पण बऱ्याच जणांमध्ये ते दिसत आहे. भगवान लोके हे देखील तशाच पध्दतीने काम करत आहेत. रस्त्यावर पडलेल्या अपघाती जखमींना उचलून रुग्णालयात दाखल केले. आमचे पत्रकार , सरपंच, सोसायटी चेअरमन , नाट्य संस्कृती व साहित्य चळवळीत , क्रिडा स्पर्धांमध्ये पारंगत आहेत. महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांची इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये एकजुट कायम आहे.

प्रास्ताविकात अध्यक्ष भगवान लोके म्हणाले , कणकवली तालुका पत्रकार संघातील सभासदांच्या एकजुटीमुळे आतापर्यंत विविध उपक्रम यशस्वी राबवत आहोत. पुरस्कार वितरण सोहळा हा एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा सोहळा आहे . समाजातील विविध घटकांना हे पुरस्कार दिले जातात. संघाच्यावतीने गेल्या वर्षभरात स्वच्छता मोहीम , रक्तदान शिबिर , वृक्ष लागवड , आरोग्य शिबिर व पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले. आरोग्य , टोलमाफी यासारखे सामाजिक प्रश्न देखील पत्रकारसंघाने हाती घेतले आहेत. कणकवलीतील पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प व्हाव, भवन व्हावे , अशी धारणा पत्रकारांची आहे. तसेच पंचायत समिती मध्ये पत्रकार कक्ष आहे,त्या ठिकाणी अद्यावत फर्निचर करून मिळावे.

पुरस्काराला उत्तर देताना पत्रकार चंद्रशेखर देसाई म्हणाले, पत्रकारितेत काम करत असताना अनेकवेळा सामाजिक भावनेतून अनेक प्रश्न मांडले. बातमीला न्याय देण्यासाठी परखड भूमिका बातमीतून मांडली. काही जणांच्या भावना दुखावल्या असतील. मात्र, आज हा मला उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे. काम करण्याची नवीन प्रेरणा मिळाली आहे.
यावेळी शेतकरी परदेश अभ्यास दौ-यात ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण यांनी सहभाग घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच भिरवंडे सरपंच नितीन सावंत व उत्तम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शोभिवंत रोप देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक राजेश कदम तर आभार सचिव संजय सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!