सिंधुदुर्ग क्रीडा विकासाला नवे बळ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्ग क्रीडा विकासाला नवे बळ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग क्रीडा विकासाला नवे बळ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय*

*आधुनिक सुविधा, तालुकास्तरावर क्रीडा साहित्य उपलब्ध होणार*

*क्रीडा संकुलाचा विस्तार, ग्रामीण खेळाडूंना मिळणार प्रोत्साहन*

*सिंधुदुर्गनगरी*

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली १ मे रोजी पार पडली. या बैठकीत क्रीडा संकुलातील प्रलंबित विषयांवर सखोल चर्चा करून पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्याची क्रीडा संस्कृती वाढण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली.

बैठकीत बॅडमिंटन हॉलमधील जुनी व खराब झालेली टेराफ्लेक्स मॅट बदलून अत्याधुनिक Synthetic Sports Flooring (BWF Approved) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलामुळे खेळाडूंना सुरक्षित, दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या कामगिरीतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

शासनाच्या वाढीव १५ कोटी रुपयांच्या अनुदानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील आरक्षित भूखंड हस्तांतरित करून क्रीडा संकुलाच्या विस्तारास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भविष्यात अधिक आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संकुलाच्या प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच वसतिगृह इमारत क्र. २ आणि स्वातंत्र्य स्मारक हॉलच्या रंगकाम, दुरुस्ती व देखभाल कामांना मंजुरी देऊन सुविधा अधिक सुस्थितीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाढीव निधीतून नव्या क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वास्तुविशारद निवडीसंदर्भात सादरीकरण घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. आगामी शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने इनडोअर खेळांसाठी आवश्यक मॅट खरेदी तसेच स्वातंत्र्य स्मारक हॉल स्पर्धांसाठी सज्ज करण्यासही हिरवा कंदील देण्यात आला.

याचबरोबर, जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येकी एक कबड्डी मॅट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या गुणवत्तेला चालना मिळणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम, आधुनिक आणि खेळाडू-केंद्रित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.

बैठकीस आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर तसेच समितीचे सदस्य, अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!