*कोंकण एक्सप्रेस*
*महसूल व्यवस्थेत डिजिटल क्रांती :*
*‘आय.ए.डब्ल्यू सिंधुदुर्ग’ वेब अँप्लीकेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*
*सिंधुदुर्गनगरी, दि. ०१ (जि.मा.का) :*
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल व लेखापरीक्षण व्यवस्थेला डिजिटल बळ देणारे ‘IAW सिंधुदुर्ग’ या आधुनिक वेब अँप्लीकेशनचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे अंतर्गत लेखा परीक्षण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
या प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, पोलीस पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.
लोकलेखा समितीच्या शिफारशीनुसार १९७७ पासून कार्यरत असलेल्या अंतर्गत लेखा परीक्षण पथकाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त १४ कार्यालयांचे महसूली जमेचे लेखापरीक्षण केले जाते. या वेब अँप्लीकेशनचे माध्यमातून उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी, तहसीलदार तसेच लेखा परीक्षण पथकातील अधिकारी व सहाय्यक अशा एकूण ३६ वापरकर्त्यांना लॉगिन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ७४० प्रलंबित परिच्छेदांचा तपशील ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून, १९८६ सालापासूनचे जुने प्रकरणेही सहजपणे पाहता येणार आहेत.
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने व्हावा, अनुपालन अहवाल सुसूत्रपणे सादर व्हावेत आणि वसुलीची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने या अॅपमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. संभाव्य वार्षिक दौरे, लेखापरीक्षण सूचनापत्र, तपासणी सूची, स्थायी आदेश, मसुदा अहवाल (ड्राफ्ट), अंतिम अहवाल, ऑनलाईन अनुपालन सादर करण्याची सोय, तसेच मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रगती अहवाल यांचा समावेश या प्रणालीत करण्यात आला आहे. याशिवाय पथक सदस्यांच्या दैनंदिनीची नोंद ठेवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

