*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात महिला सक्षमीकरण केंद्राचे लोकार्पण*
*सिंधुदुर्गनगरी, दि. ०१ (जि.मा.का) :*
महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती अंतर्गत ‘सामर्थ्या’ उपयोजनेतून उभारण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास आमदार निलेश राणे तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. लिंग संवेदनशीलता, हुंडाबळी प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध जनजागृती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर शाळा, महाविद्यालये, शासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी समुपदेशन, परिसंवाद, कार्यशाळा व जनजागृती मोहिमा राबविण्यात येतील.
संकल्प महिला सक्षमीकरण केंद्र हि केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. हि योजना महिला व बाल विकास विभागा अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत चालविली जाते.या योजनेतर्गत सद्यस्थितीत पाच जणांचा स्टाफ कार्यरत आहे यामध्ये जेंडर स्पेशालिस्ट , कार्यालयीन सहाय्यक , दोन डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि बहुउद्देशीय कर्मचारी कार्यरत आहेत.
महिला सक्षमीकरण केंद्र हे केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न राहता मिशन शक्ती अंतर्गत विविध उपक्रमांचे समन्वय व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष म्हणूनही कार्य करणार आहे. महिलांसाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या विविध योजना, सुविधा आणि अधिकारांची माहिती देणे, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभागासाठी महिलांना प्रेरित करणे ही केंद्राची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री बापू भिकू शिणगारे, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अधिनिस्त महिला सक्षमीकरण केंद्र, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अभय केंद्र, जिल्हा निरीक्षण व बाल गृह, सखी वन स्टॉप सेंटर या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

