दोडामार्गमध्ये तीव्र पाणीटंचाई; नळपाणी योजना विस्कळीत, नागरिकांच्या मदतीसाठी बाबुराव धुरी पुढे

दोडामार्गमध्ये तीव्र पाणीटंचाई; नळपाणी योजना विस्कळीत, नागरिकांच्या मदतीसाठी बाबुराव धुरी पुढे

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गमध्ये तीव्र पाणीटंचाई; नळपाणी योजना विस्कळीत, नागरिकांच्या मदतीसाठी बाबुराव धुरी पुढे..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळपाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. विहिरी आणि आड पूर्णपणे कोरडे पडले असून नैसर्गिक पाणीस्रोत आटल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला व गृहिणींना पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यांनी पाणीटंचाईग्रस्त नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन करत त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली आहे.

धुरी यांनी सांगितले की, ज्या गावांमध्ये पाण्याची कमतरता आहे, टँकर वेळेवर पोहोचत नाहीत किंवा नळांना पाणी येत नाही, अशा सर्व नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी. “नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवा करत असून कोणतेही पद नसतानाही जनतेच्या अडचणी सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे. तालुक्यातील कुठलाही नागरिक पाण्याअभावी त्रस्त राहणार नाही, यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करण्यात येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, ज्या भागांमध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र आहे, त्या ठिकाणची सविस्तर माहिती — गावाचे नाव, किती दिवसांपासून समस्या आहे, प्रभावित कुटुंबांची संख्या — नागरिकांनी तातडीने कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, धुरी यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांचे पथक लवकरच तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ टँकर सेवा सुरू करण्याची तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी करणार आहे.

सध्या पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होत असून प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!