हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी

हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी*

*मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून येण्या-जाण्याचा मार्ग केला बंद*

*देवगड प्रतिनिधी*

हिंदळे येथील सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षिका विमल गणेश प्रभु यांच्या घराच्या मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे प्रभु या आपल्याच घरात अडकून पडल्या असून, त्यांना अंगणातून बाहेर पडणेही अशक्य झाले आहे.

विमल प्रभु या घरात एकट्याच वास्तव्यास असतात. असे असताना अचानक त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर चिरे लावून अडथळा निर्माण करण्यात आला आहे. एक वृद्ध महिला घरात एकटी असताना त्यांचा हक्काचा मार्ग रोखल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आजारपण किंवा अन्य कोणत्याही तातडीच्या कामासाठी बाहेर पडायचे असल्यास त्यांच्यासमोर आता मोठा अडथळा उभा राहिला आहे.

या अन्यायाबाबत प्रभू यांनी पोलीस हेल्पलाइन ११२ वर संपर्क साधून मदत मागण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तेथून प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समिती अध्यक्षांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली असता, त्यांनी वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, घराबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद असल्यामुळे विमल प्रभू यांना कोठेही जाणे शक्य नाही. घराबाहेर पडता येत नसल्याने अखेर त्यांना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार घ्यावा लागला आहे. “प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा,” अशी आर्त हाक विमल प्रभू यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!