समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांच्या विचारांचे कृतीत रूपांतर गरजेचे

समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांच्या विचारांचे कृतीत रूपांतर गरजेचे

*कोंकण एक्सप्रेस*

*समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांच्या विचारांचे कृतीत रूपांतर गरजेचे*

*-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*

*सिंधुदुर्गनगरी, दि.१४ (जिमाका):*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत झाली आहे. समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या आदराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, प्रतिभा पोवार, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, स्त्री सक्षमीकरणाच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेबांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. महिलांना शिक्षण, वारसाहक्क, तसेच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती नुकतीच साजरी झाली. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी दिशा मिळाली असून संपूर्ण देशालाही एक व्यापक आणि समतावादी दृष्टिकोन लाभला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, हीच दोन्ही महामानवांच्या कार्याची प्रमुख समानता असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी या दोन्ही महान नेत्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. महिलांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. महिलांना समान संधी उपलब्ध करून देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले. दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले हे दोन्ही तेजस्वी महामानव आपल्या देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने पवित्र झालेल्या या भूमीत जन्म घेणे हे आपले भाग्य असल्याची भावना जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी समता गीत सादर केले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनप्रवास विलास आरोंदेकर, विठ्ठल मालनकर, निलेश वेरुळकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!