*कोंकण एक्सप्रेस*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कणकवलीत अभिवादन*
*भीमपोवाड्याच्या दमदार सादरीकरणात सामाजिक समता सप्ताहाची प्रेरणादायी सांगता*
*सिंधुदुर्गनगरी,१४:*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कणकवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसिलदार दिक्षांत देशपांडे, सहायक आयुक्त संतोष चिकणे, समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गणेश हुक्कीरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समतेचा संदेश अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाची सांगता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’ अंतर्गत आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे उत्साहात करण्यात आली. लोकशाहीर आझाद नाईकवडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार भीमपोवाड्याने वातावरण भारावून गेले. त्यांच्या सादरीकरणातून डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि समाजपरिवर्तनाच्या विचारांचा प्रभावी व प्रेरणादायी आढावा मांडण्यात आला. समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांनी भारलेला हा कार्यक्रम कणकवलीत सामाजिक जागृतीचा ठसा उमटवून गेला.

