वाढदिवस लोकनेत्याचा, संकल्प जन-आरोग्याचा

वाढदिवस लोकनेत्याचा, संकल्प जन-आरोग्याचा

*कोंकण एक्सप्रेस*

*वाढदिवस लोकनेत्याचा, संकल्प जन-आरोग्याचा!*

* खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडवे येथे भव्य मोफत महा-आरोग्य शिबीर*

*पडवे (प्रतिनिधी):*

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘एसएसपीएम’ (SSPM) मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे यांच्या वतीने भव्य मोफत महा-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “वाढदिवस लोकनेत्याचा, संकल्प जन-आरोग्याचा” हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेले हे शिबीर ९ आणि १० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे.
या महा-आरोग्य शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे ‘सर्व विभागांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली मोफत तपासणी’ केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्करोग, बालरोग, त्वचारोग, नेत्ररोग, किडनी विकार, अस्थिरोग, जनरल सर्जरी, दंतरोग, कान-नाक-घसा, जनरल मेडिसिन, फिजिओथेरपी आणि आहारतज्ज्ञ सल्ला यांसारख्या विविध आरोग्य सेवांचा लाभ रुग्णांना घेता येईल.
तपासणीसोबतच रुग्णांना मोफत सोनोग्राफी, एक्स-रे, लॅब तपासणी, औषधे, २D इको आणि ई.सी.जी. यांसारख्या महागड्या चाचण्यांची सुविधाही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे शिबीर एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाइम हॉस्पिटल, पडवे (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संपन्न होणार आहे.
शिबिराच्या अधिक माहितीसाठी अनिल कुडपकर (९४२०९०७६६१) किंवा हॉस्पिटलच्या ८२०८३२८११८ व ९३७००५६०७६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

*******
‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ घाट मार्गासाठी खासदार नारायण राणे आग्रही;

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
कुडाळ:
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सुखकर व्हावे, यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. कुडाळ तालुक्यातील ऐतिहासिक ‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ या घाट मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन, त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करावे, अशी आग्रही मागणी राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार राणे यांनी ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात या घाट मार्गाचे दूरगामी फायदे विशद केले आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यास वेंगुर्ले ते कोल्हापूर दरम्यानचे अंतर तब्बल ४० ते ४५ किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत दीड ते दोन तासांची मोठी बचत होईल. विशेष म्हणजे, हा केवळ ५ किलोमीटरचा घाट रस्ता असल्याने इतर घाट मार्गांच्या तुलनेत तो अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.
हा मार्ग केवळ प्रवासासाठीच नव्हे, तर कोकणच्या अर्थव्यवस्थेसाठीही जीवनवाहिनी ठरू शकतो, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे. या मार्गामुळे ताजे मासे अत्यंत कमी वेळेत कोल्हापूरच्या बाजारपेठेत पोहोचवणे शक्य होईल, ज्यामुळे मच्छीमार बांधवांना मोठा फायदा होईल. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये एक नवीन पर्यटन साखळी निर्माण होईल. या विकास प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक विकासाला गती मिळेल, असे खा.राणे यांनी म्हटले आहे.
शिवकालीन ऐतिहासिक वारसा
‘आंजिवडे-भैरीची पाणंद’ हा मार्ग शिवकालीन काळापासून प्रचलित असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर ‘वेंगुर्ले बंदर आंजिवडे पाटगाव कोल्हापूर घाट रस्ता कृती समिती’ने केलेल्या निवेदनाची दखल घेऊन राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून, आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता द्याव्यात आणि हा जनहिताचा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी विनंती खासदार नारायण राणे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!