कणकवलीतील वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय

कणकवलीतील वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीतील वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय!.*

*उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था ; बेशिस्त वाहनांवर कडक कारवाईचा इशारा*

*शहरातील शिस्त अबाधित राखण्यासाठी नगरपंचायतचे सहकार्य मिळणार – नगराध्यक्ष संदेश पारकर*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर अखेर प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनियमित वाहन पार्किंग, सर्व्हिस रस्त्यांवरील अतिक्रमण आणि बंद अवस्थेतील सीसीटीव्ही यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

बस स्थानक ते गांगो मंदिर, गांगो मंदिर ते नरडवे तिठा, पटवर्धन चौक ते पोलीस ठाणे तसेच नरडवे तिठा ते रेल्वे स्टेशन या प्रमुख मार्गांवर वाहनांची अनियंत्रित पार्किंग होत असल्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून उड्डाणपुलाखालील जागेत तात्पुरत्या स्वरूपात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी वाहतूक पोलिसांना तातडीने नियोजन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच सर्व्हिस रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणारी वाहन पार्किंग व वाहने रस्त्यावर लावून विक्री करणे यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने अशा प्रकारांना पूर्णतः प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.

बस स्थानक परिसरात विशेषतः बस बाहेर पडताना बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याने या ठिकाणी कडक नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही परिणाम होत असून, ते तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.

दरम्यान, मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी पोस्ट कार्यालय परिसर, भालचंद्र महाराज मठ रस्ता, तेली आळी या भागांत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने त्या दिवशी वाहन पार्किंगची तात्पुरती व्यवस्था क्रीडांगणाजवळ करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नगरपंचायतीच्या स्तरावर आवश्यक तेथे पूर्ण सहकार्य दिले जाईल, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला. या उपाय – योजनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बैठकीस उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, तसेच अमोल आघम, रविंद्र म्हाडेश्वर उपस्थित होते. याशिवाय नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, लुकेश कांबळी आणि सत्यजित पारकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!