*कोंकण एक्सप्रेस*
*सुशांत दळवी खून प्रकरणी आरोपीस न्यायालयीन कोठडी*
*खून अनावधनाने की पूर्वनियोजीत ?*
*पोलीस तपास नेमक्या कोणत्या दिशेने ? – नागरिकांचा सवाल*
*कणकवली : प्रतिनिधी*
युवा बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अमर कदम याला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने या प्रकरणाच्या तपासाच्या दिशेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
२७ मार्च रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. सुशांत दळवी व अमर कदम हे दोघे शिकारीसाठी गेले असताना अमरच्या ताब्यातील काडतुसाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी सुशांत यांच्या मानेवर लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने अमर कदम याला अटक केली होती. सुरुवातीला विसंगत माहिती देणाऱ्या अमरने अखेर सुशांतच्या मृत्यूस आपणच जबाबदार असल्याची कबुली दिली होती.
मात्र, हा प्रकार अनवधानाने घडलेला अपघात आहे की पूर्वनियोजित खून, हा महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. अटकेनंतर अमर कदम याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या कालावधीत झालेल्या तपासाबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, सुशांत दळवी यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), शवविच्छेदन अहवाल तसेच फॉरेन्सिक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असल्याने सुशांत यांना नेमक्या किती गोळ्या लागल्या, हेही स्पष्ट झालेले नाही.
आरोपी अमर कदम याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली, तरी या खूनप्रकरणाबाबत जिल्हावासीयांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा सखोल आणि पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

