आग विझवण्यात सातत्य नसल्याने डम्पिंग ग्राउंड ची आग पाच दिवस दुमस्ते आहे

आग विझवण्यात सातत्य नसल्याने डम्पिंग ग्राउंड ची आग पाच दिवस दुमस्ते आहे

*कोंकण एक्सप्रेस*

*आग विझवण्यात सातत्य नसल्याने डम्पिंग ग्राउंड ची आग पाच दिवस दुमस्ते आहे*

*57 दिव्यांग बांधवांवर अन्याय झाल्यास एक मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार  – नगरसेवक बंडू हर्णे*

*कणकवली : सौ. संजना हळदिवे*

कणकवली नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले असते, तर गारबेज डेपोला लागलेली आग वेळेत नियंत्रणात आणता आली असती, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बंडू हर्णे यांनी केली. गारबेज डेपोची पाहणी केली असता अनेक यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

येथील समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेविका मेघा गांगण, प्रतिक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर तसेच नगरसेवक स्वप्नील राणे उपस्थित होते.

हर्णे म्हणाले, नगरपंचायतीच्या गारबेज डेपोला शनिवारी आग लागली होती. ही आग संपूर्ण डम्पिंग ग्राऊंडमध्ये पसरली होती. आग विझवण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न झाले, मात्र त्यात सातत्य नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात विलंब झाला. पाहणीदरम्यान खत निर्मिती प्रक्रिया बंद असल्याचे, सुक्या कचऱ्याची फिलिंग मशिन बंद असल्याचे तसेच कचऱ्याचे मोजमाप करणारे युनिटही कार्यरत नसल्याचे आढळून आले. याबाबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या निधीच्या वाटपावरूनही वाद निर्माण झाला आहे. नगरपंचायतीत निव्वळ नफ्याच्या ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यावर्षी २ लाख ८० हजार रुपयांचा निधी उपलब्ध असून ५८ लाभार्थी आहेत. नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्याला सुमारे ४,८२७ रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एका दिव्यांग कार्यकर्त्यासाठी १ लाख ८० हजार रुपयांची दुचाकी देण्याचा निर्णय घेतल्याने उर्वरित ५७ लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप हर्णे यांनी केला. या निर्णयाविरोधात १ मे, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांसह साखळी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सत्ताधारी केवळ फोटोसेशन आणि दिखाऊ कामांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष प्रशासनाकडून काम करून घेण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच टेंडर प्रक्रियेत अधिक लक्ष दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी राबविण्यात येणारी मोहीम सध्या बंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरसेविका मेघा गांगण यांनी नरडवे रस्त्यावर सुरू असलेल्या मच्छी विक्रीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. नगरपंचायतीचे मच्छीमार्केट उपलब्ध असतानाही विक्रेते रस्त्याच्या कडेला विक्री करत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!