जिल्हास्तरीय ‘नवनीत’ चित्रकला स्पर्धेत कणकवलीच्या मोहित सुतारचे यश

जिल्हास्तरीय ‘नवनीत’ चित्रकला स्पर्धेत कणकवलीच्या मोहित सुतारचे यश

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हास्तरीय ‘नवनीत’ चित्रकला स्पर्धेत कणकवलीच्या मोहित सुतारचे यश*

*कणकवली : संजना हळदिवे*

​ प्रतिवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘नवनीत मास्टर स्ट्रोक’ चित्रकला स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी कुमार मोहित नीलकंठ सुतार याने जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे विद्यामंदिर प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
​नवनीत कंपनीतर्फे दरवर्षी जुलै महिन्यात ही स्पर्धा राज्यभर घेतली जाते. यावर्षी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथील माध्यमिक, प्राथमिक व इंग्रजी माध्यमाच्या सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. शालेय स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या २२ विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड करून त्यांना शालेय पातळीवर सन्मानित करण्यात आले होते. या निवडक चित्रांमधून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मोहित सुतार याच्या चित्राची निवड झाली आहे.
​मोहित केवळ चित्रकलेतच नाही, तर इतर क्षेत्रांतही अग्रेसर आहे. त्याला यापूर्वी अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली आहेत. चित्रकलेसोबतच तबला वादन, गायन आणि शालेय अभ्यासामध्ये तो नेहमीच चमकत असतो. चित्रकला क्षेत्रातच करिअर करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. त्याला शाळेचे कलाशिक्षक श्री. प्रसाद राणे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभत असून, त्याला त्याच्या आईचीही मोठी साथ लाभते.
​मोहितच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय भाईसाहेब तवटे यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. वनवे, शाळा पालक संघाचे अध्यक्ष श्री. सावंत व सर्व विभागाचे शिक्षक उपस्थित होते.
​मोहितच्या या यशामुळे संपूर्ण कणकवली परिसरात त्याचे कौतुक होत असून, त्याच्या पुढील वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!