*कोंकण एक्सप्रेस*
*ढोलताशांच्या गजरात सातेरी मंदिरात मळीचे आगमन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव) *
मळलेपन विधीसाठी ढोलताशांच्या गजरात अवसारी देवतांच्या प्रमुख उपस्थितीत आज अणसूर घाटी येथून सातेरी मंदिरात मळ (वारूळाची माती) आणण्यात आली. या कार्यात बहुसंख्य भाविकांनी आपला सहभाग नोंदवला.
वेंगुल्र्याची ग्रामदेवी श्री सातेरीचा मळलेपन विधी व शतचंडी महायाग अनुष्ठान सोहळा 31 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. या मळलेपन कार्यासाठी लागणारी मळ (वारूळाची माती) आज मंगळवारी अणसूर घाटी येथून आणण्यात आली. सकाळीच सातेरी मंदिरातून तरंगदेवतांनी अवसारी स्वरूपात आपल्या भक्तांसह मळ आणण्यासाठी प्रस्थान केले. अणसूर घाटी येथील नियोजित ठिकाणी पोहचल्यावर तेथे धार्मिक विधी करण्यात आला. त्यानंतर अवसारी देवतेकडून वारूळाची माती काढून झाल्यावर ढोलताशांच्या गजरात बहुसंख्य भाविकांनी ती मळ (वारूळाची माती) सातेरी मंदिरात आणून ठेवली. या कार्यक्रमादरम्यान, शारदा प्रतिष्ठान रामघाटतर्फे सर्व भाविकांना अल्पोपहार देण्यात आला.
दरम्यान, आज आणून ठेवलेल्या वारूळाच्या मातीवर पुढील काही दिवस प्रक्रिया केली जाणार असून 13 एप्रिल रोजी मळलेपन हा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

