कॅरममध्ये मीरा आपटे हिची राष्ट्रीय स्तरावर निवड

कॅरममध्ये मीरा आपटे हिची राष्ट्रीय स्तरावर निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*कॅरममध्ये मीरा आपटे हिची राष्ट्रीय स्तरावर निवड*

*कनिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कनेडी हायस्कूलची चमक*

*कनेडी हायस्कूलचा कॅरम मधील दबदबा कायम*

*कणकवली : प्रतिनिधी*

५९वी राज्यस्तरीय कनिष्ठ गट अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि. २६ मार्च २०२६ रोजी दादर मुंबई येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील इयत्ता ७वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कु. मीरा मकरंद आपटे हिने १४ वर्षांखालील गटात उत्कृष्ट कॅरम खेळाचे प्रदर्शन करून सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या उज्वल यशामुळे ती आता महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहे.

पहिल्या फेरीत मीराचा सामना पुण्याच्या श्रावणी तंगडे हिच्यासोबत झाला. हा सामना मीराने २१- ४ , २१- ६ असा सहज जिंकला. पुढील फेरीत तिचा सामना धुळ्याच्या रश्मिता जाधव हिच्या सोबत होता. हा सामना तिने १६- ८, १४-०६ असा सरळ दोन सेट्समध्ये जिंकला.पुढील फेरीत तिचा सामना नाशिकच्या बलाढ्य भूमिका वाघमारे हिच्यासोबत झाला. या लढतीत मीराने भूमिकावर १६-१४, १२-१५, १४-०८असा संघर्षमय विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ ठाण्याच्या प्रथम मानांकित सारा डेवण तिच्यासोबत पडली. या लढतीत मात्र मीराला साराकडून ०८-१८, १०-१६ असा सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. पुढे प्ले ऑफ लढतीत मीराने मुंबईच्या बलाढ्य नेत्रा श्रीनिवास पंथगणी हिचा १८-१४, २१-०० असा सरळ सेट्स मध्ये पराभव करत लखनौ उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात आपली निवड पक्की केली.

सदर यशस्वी विद्यार्थिनीची लखनौ – उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.

या पूर्वी सुद्धा याच प्रशालेच्या कु. दिक्षा चव्हाण या विद्यार्थिनीने कॅरममध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक प्राप्त केले होते. तसेच याच प्रशालेच्या कु. सृष्टी सावंत, कु. अनुश्री सावंत व कु. श्रेया महाडीक या विद्यार्थिनींनी सुद्धा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रीय पातळीवर निवड होणारी मीरा ही कनेडी हायस्कूलची पाचवी कॅरम खेळाडू बनली आहे.

क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कु. मीरा आपटे हिला प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक तसेच तिचे वडील श्री. मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण आणि जिल्ह्यातील नामवंत कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव व श्री. पांडुरंग पाताडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!