*कोंकण एक्सप्रेस*
*आंबेडकर भवनासाठी रस्ता व प्रसाधनगृहाची मागणी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आशिये–कलमठ मार्गावरील आंबेडकर भवन इमारतीत विविध सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच महिलांचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी पायवाट अथवा रस्त्याची सुविधा नसून, अत्यावश्यक असणाऱ्या प्रसाधनगृहाचाही अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच घळणं भाग असल्याने संरक्षण कठड्याचीही मागणी होती.
या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासंघ, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने रस्ता व प्रसाधनगृह उभारणीची व सरंक्षण भिंत उभारणे याची मागणी करण्यात आली आहे. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले.
यावेळी नगरसेवक लुकेश कांबळे, जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, सरचिटणीस संजय पेंडुरकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमाताई हरकुळकर, महिला सरचिटणीस अपूर्वाताई पवार, संरक्षण विभाग प्रमुख दिलीप तरंदळेकर, कणकवली अध्यक्ष भाई जाधव, सचिव सुभाष जाधव, कोषाध्यक्ष महेंद्र कदम, धर्मचंद्र हिंदळेकर, प्रकाश कांबळे, संजय कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासंघाच्या जिल्हा, महिला व कणकवली तालुका शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने आंबेडकर भवन परिसराची पाहणी करून संबंधित मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आवश्यक त्या सोयी – सुविधांसाठी पाठपुरावा करून मागणी लवकरच पूर्णत्वास नेण्याचा विश्वास श्री. पारकर यांनी दिला.

