मुकादम अमर कदम याने घातली दळवींच्या डोक्यात गोळी…

मुकादम अमर कदम याने घातली दळवींच्या डोक्यात गोळी…

*कोंकण एक्सप्रेस*

*मुकादम अमर कदम याने घातली दळवींच्या डोक्यात गोळी…*

*प्राथमिक तपासातील माहिती; आणखी दोघांचा सहभाग असण्याची शक्यता…*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा खून त्यांच्याकडेच कामाला असलेल्या अमर सत्यवान कदम (वय २१, ओरोस डोंगरेवाडी) याने केला असल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. तसेच या प्रकरणात आणखी दोघांचा समावेश असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

शिकारीच्या उद्देशाने मयत सुशांत दळवी हे काल (ता. २६) रात्री पावणे बाराच्या सुमारास मुडेश्वर मैदानासमोरील गणेश नगर आणि गडनदी दरम्यानच्या जंगलमय भागात गेले होते. त्याच परिसरात सुशांत दळवी याच्या डोक्यात अमर कदम याने गोळी घातली. यात दळवी हे जागीच मयत झाले. त्यानंतर दळवी यांचा मृतदेह त्या ठिकाणाहून पंचवीस ते तीस फुट अंतरावर आणून टाकून आरोपी अमर सत्यवान कदम आणि त्याचे साथीदार तेथून पसार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान सुशांत दळवी याचा खून पैशांसाठी की अन्य काही कारणांसाठी करण्यात आला. याचा तपास कणकवली पोलीस करत आहेत. याखेरीज दळवी याच्या हत्येसाठी गावठी पिस्तूल किंवा कट्टा वापरण्यात आल्याचाही पोलिसांचा संशय आहे. मात्र सायंकाळ पर्यंत आरोपीकडून हत्यार ताब्यात घेण्यात आले नव्हते.

मयत सुशांत दळवी याच्या डोक्यामध्येच गोळी अडकलेली आहे. त्यामुळे फॉरेस्टिक टीमच्या माध्यमातून सुशांत दळवी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. त्यासाठी सायंकाळी हा मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या शवविच्छेदन अहवालानंतर दळवी यांच्या डोक्यात पिस्तूलातून किंवा १२ बोअरच्या बंदूकीतून गोळी घालण्यात आली याचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!