*कोंकण एक्सप्रेस*
*“पाणी वाचवा, भविष्य घडवा” संदेशासह सिंधुदुर्गनगरीत ‘जलजागृती सप्ताहा’चा शुभारंभ*
*सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जिमाका)*
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने १६ ते २२ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जलजागृती सप्ताहा’चा शुभारंभ आज सिंधुदुर्गनगरी येथे उत्साहात झाला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते जलपूजन व कलश स्थापनेद्वारे या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्ह्यातील तिलारी, तेरेखोल, वाघोटन, कर्ली, देवगड, आचरा आणि गडनदी या नद्यांचे पाणी एकत्रित करून कलशामध्ये जलपूजन करण्यात आले. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करत जलसंवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच उपस्थितांना पाणी बचतीची शपथ देण्यात आली.
समाजात जलसाक्षरता निर्माण करणे आणि पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने दरवर्षी ‘जलजागृती सप्ताह’ साजरा केला जातो. पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचा काटकसरीने आणि सुयोग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी सिंचन व्यवस्थापन व पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाणी बचतीची आधुनिक तंत्रे आत्मसात करावीत, यासाठी या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांवर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १७ ते २१ मार्च या कालावधीत देवघर, तिलारी आणि निळेली प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात कार्यशाळा आयोजित करून सिंचन पद्धती, पिकांना लागणारे पाणी तसेच पाणी बचतीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी आणि कणकवली या तालुक्यांमध्ये पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी विशेष बैठका घेण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
यावेळी अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी, कार्यकारी अभियंता (सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, सावंतवाडी), कार्यकारी अभियंता (मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल), कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे विभाग) तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

