*कोंकण एक्सप्रेस*
*हापूस आंबा पाठोपाठ काजूपिकही संकटात*
*हवामानातील बदलाने बागायतदार हवालदिल*
*शिरगाव :संतोष साळसकर*
कोकणातील मुख्य नगदी पीक असलेल्या हापूस आंब्यानंतर आता काजूपिकही हवामानातील बदलाच्या तडाख्यात सापडले आहे. यावर्षी काजू पिकाला सुरुवातीला आलेला मोहर समाधानकारक वाटत असतानाच ढगाळ वातावरण, दाट धुके, दव आणि अचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे काजूचा मोहर मोठ्या प्रमाणात करपला असून बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगड तालुक्यातील कुवळे, सांडवे, रेंबवली, साळशी आणि शिरगाव भागातील काजू बागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. वैभव शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, देवगड कृषी अधिकारी आरती पाटील तसेच इतर अधिकाऱ्यांनी काजू बागांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, काजू बागेची साफसफाई, खते, औषध फवारणी आणि मजुरीचा वाढता खर्च पाहता यंदा हा खर्चही निघणे कठीण झाले आहे. तसेच हवामानातील बदलाचा परिणाम लक्षात घेता यावर्षी काजूचे उत्पादन केवळ ५० टक्क्यांपेक्षाही कमी राहण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, वातावरणातील बदलामुळे तयार झालेल्या काजू बियांवर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक बी काळवंडली आहेत. अशा दर्जाहीन मालाला व्यापारी योग्य दर देण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
एकीकडे हवामानातील बदलाचा परिणाम जाणवत असताना दुसरीकडे वानर, गवारेडे आणि साळींदर यांसारख्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना दिवसभर बागेत राखण करावी लागत आहे. त्यामुळे कमी उत्पादन आणि वन्य प्राण्यांचा त्रास अशा दुहेरी संकटात बागायतदार सापडला आहे.
“यंदा निसर्गानेच आमचा घास हिरावून घेतला,” अशी आर्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या क्षेत्रभेटीच्या दौऱ्यामध्ये शिरगाव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बापूसाहेब लांबाडे, आचरा मंडळ कृषी अधिकारी आबर्डेकर, सहाय्यक कृषी अधिकारी गुरुनाथ बोडेकर, साळशी सरपंच वैशाली सुतार तसेच अनिल पोकळे, निलेश नाईक, विक्रांत नाईक, प्रभाकर साळसकर, योगेश मिराशी, संतोष देवणे, विजय सुतार, उमेश नाईक, निलेश लाड, चेतन तोरसेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, या क्षेत्रभेटीचा सविस्तर अहवाल लवकरच शासनाला सादर करण्यात येणार असून त्यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरणार असल्याचे डॉ. वैभव शिंदे यांनी सांगितले.

