ग्रामीण विकासावर संशोधन; प्रा. विवेक चव्हाण यांना डॉक्टरेट

ग्रामीण विकासावर संशोधन; प्रा. विवेक चव्हाण यांना डॉक्टरेट

*कोंकण एक्सप्रेस*

*ग्रामीण विकासावर संशोधन; प्रा. विवेक चव्हाण यांना डॉक्टरेट*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभाग प्रमुख प्रा. विवेक चव्हाण यांनी मुंबई विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण अध्ययन व विस्तार विभागामार्फत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रा. चव्हाण यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची भूमिका : एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण विकास प्रक्रियेत वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्र या संस्थेचे योगदान, शेतकऱ्यांना दिलेले प्रशिक्षण, सुधारित फळपिकांच्या वाणांची निर्मिती, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
या संशोधनासाठी त्यांना ग्रामीण अध्ययन व विस्तार विभाग, मुंबई विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. विवेक चव्हाण हे २००९ पासून बॅ. खर्डेकर महाविद्यालयात कार्यरत आहेत. २०१८ साली त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिले असून २०१९ साली उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तसेच उत्कृष्ट जिल्हास्तरीय एनएसएस युनिट म्हणून महाविद्यालयाचा गौरव झाला होता.
ग्रामीण विकास व कृषी क्षेत्राशी संबंधित विषयावर केलेले हे संशोधन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच कृषी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटोओळी – पीएचडी पदवी मिळवल्याबद्दल डॉ.विवेक चव्हाण यांचा शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांनी सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!