*कोंकण एक्सप्रेस*
*महिला दिनानिमित्त जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ*
*सिधुदुर्ग नगरी*
दि. ८ मार्च २०२६ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील मुलींसाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे संपन्न झाला. माननीय ना. श्री नितेशजी राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य व माननीय जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम 8 मार्च 2026 ते 8 जून 2026 या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे.या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आला*.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन मुलींना एचपीव्ही लस देऊन मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा विषाणू महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रमुख कारणीभूत घटक मानला जातो. या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत प्रभावी व सुरक्षित उपाय मानला जातो. त्यामुळे लहान वयात मुलींना ही लस दिल्यास भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १४ वर्ष पूर्ण झालेल्या पण १५ वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार असून पालकांनी आपल्या मुलींना या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाची देशव्यापी सुरुवात २८ मार्च २०२६ रोजी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते राजस्थान येथे करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ८ मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहातून माननीय आरोग्यमंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
*यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सुधीर धनगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर तसेच आरोग्य, वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाळके ,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. निलेश मठकर ,डीपीएचएन श्री.विक्रम पवार, विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

