*कोंकण एक्सप्रेस*
*दोन भावांचा भावस्पर्शी मिलाप : खोकरल–बोडदेची घोडेमोडणी जल्लोषात संपन्न..*
*दोडामार्ग: शुभम गवस*
पिकुळे, उसप, खोकरल, बोडदे आणि झरेबांबर ही पाच गावे म्हणजे जणू एका मातीतून उगवलेली पाच भाऊ. पूर्वीच्या काळी या पाचही गावांची घोडेमोडणी दर तिसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक दिमाखात साजरी होत असे. मात्र काही कारणास्तव मतभेद निर्माण झाल्याने या पाच गावांची पाचाफूट झाली. तरीही परंपरेचा दीप विझू न देता आजही पिकुळे–झरेबांबर आणि खोकरल–बोडदे अशी दोन-दोन गावांची घोडेमोडणी भक्तिभावाने आणि ऐक्याच्या भावनेने साजरी केली जाते.
यावर्षी खोकरल गावाने आपला जिवलग भाऊ बोडदे गावाला घोडेमोडणीसाठी सस्नेह आमंत्रित केले. ठरलेल्या दिवशी खोकरलकर मंडळी गावाच्या वेशीवर जाऊन बोडदेकर भावाचे आदरातिथ्याने स्वागत करतात. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि “भावा-भावांनो”च्या जयघोषात बोडदेकर घोड्याचे मंदिराकडे आगमन होते.
होळीपाशी खोकरलकर घोडा आपल्या भावाची आतुरतेने वाट पाहत उभा असतो. बोडदेकर घोडा वेशीवर पोहोचल्याची चाहूल लागताच खोकरलकर घोडा आणि ग्रामस्थ त्याला आणण्यासाठी पुढे सरसावतात. दोन्ही घोड्यांची भेट हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.
यानंतर दोन्ही घोडे होळीला वेढा घालून मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिरसाच्या वातावरणात हा सोहळा रंगतो. त्यानंतर श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिरात प्रवेश करून देवीच्या मानकरी (देवाचकर) यांच्या हस्ते दोन्ही घोड्यांची विधिवत पूजा केली जाते.
मंदिराच्या मंडपात दोन्ही गावचे ग्रामस्थ ताल-लयीत घोडेमोडणीचे पारंपरिक नृत्य सादर करतात. दोन्ही भावांचे हे मिलन पाहून उपस्थितांच्या मनात भावनांचा महापूर उसळतो. ऐक्य, आपुलकी आणि परंपरेचा संगम असलेला हा सोहळा खऱ्या अर्थाने नयनरम्य आणि अविस्मरणीय ठरतो.
कार्यक्रमाच्या अखेरीस दोन्ही घोडे वाजत-गाजत उसप गावच्या वेशीवर जातात. वेशीवर घोड्यांची ताटी सोडून या मंगल सोहळ्याची सांगता होते. “परत तीन वर्षांनी पुन्हा भेटू” असा शब्द देत दोन्ही गावांची मंडळी जड अंतःकरणाने आपल्या घरी परततात.
घोडेमोडणीचा हा सोहळा म्हणजे परंपरेचा सन्मान, भावबंधांचा उत्सव आणि गावकुसातील ऐक्याचे जिवंत प्रतीक होय.

