मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन

*कोंकण एक्सप्रेस*

*मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन*

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी*

*महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर*

*मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :*

राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी मुंबईच्या महापौर पदावर निवड झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी महापौर रितू तावडे यांचे अभिनंदनही केले आहे.

मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईच्या जडणघडणीत व दैदीप्यमान वाटचालीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. मुंबई आणि कोकणी माणूस हे एक अतूट समीकरण असून आज मुंबईत वास्तव्यास असलेला मोठा वर्ग हा मूळचा कोकणातील आहे.

कोकणातील नागरिकांनी मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्याने तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर असल्याने कोकणातील तरुण मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण, वैद्यकीय उपचार व रोजगारासाठी मुंबईत येत असतात. मात्र मुंबईत येणाऱ्या कोकणवासीयांसाठी आजतागायत कोणताही हक्काचा निवारा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले आहे.

कोकणातील कला, साहित्य, इतिहास व सामाजिक उपक्रमांचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक स्वतंत्र सांस्कृतिक कला-केंद्र उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबईत उच्च शिक्षण व वैद्यकीय कारणासाठी येणाऱ्या कोकणवासीयांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!