राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटे प्रथम

राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटे प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत मैत्रेयी आपटे प्रथम*

*सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा*

*कणकवली : प्रतिनिधि *

सर परशुराम भाऊ महाविद्यालय वादसभा प्रस्तुत कै. डाॅ. पी. जी. सहस्रबुद्धे राष्ट्रीय पातळीवरील आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कुमारी मैत्रेयी मकरंद आपटे (इ. ११वी) हिने उत्कृष्ट वक्तृत्वाचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. सृजक आणि निरीक्षक, कला नेमकी कोणाला परिभाषित करते?, काळ्या अर्थव्यवस्थेचे सावट व्यवस्थेला झाकोळत आहे का?, प्रदीर्घ युद्धे : संघर्ष निवारणापासून ते अगतिकतेपर्यंत’, सहजीवनाच्या संस्कृती पासून ते उपभोगापर्यंत निसर्गाचे व्यापारीकरण असे विषय या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आले होते. पैकी ‘प्रदीर्घ युद्धे : संघर्ष निवारणापासून ती अगतिकतेपर्यंत’ या विषयावर मैत्रेयीने अतिशय ओघवत्या शैलीत उत्कृष्ट वक्तृत्व सादर करून उपस्थित रसिकांची व परीक्षकांची मने जिंकून घेतली. सदर यशाबद्दल तिला रोख रू. ५०००/- , सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत भारत देशातील ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा ही मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये घेतली गेली. यापूर्वी सुद्धा एकपात्री अभिनय, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी अशा अनेक स्पर्धांमध्ये मैत्रेयीने पारितोषिके पटकावली आहेत. ती कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेची माजी विद्यार्थिनी असून सध्या ती नाट्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथील एस्. पी. महाविद्यालय येथे शिक्षण घेत आहे.

सदर यशाबद्दल सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे चे कार्यकारी मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मा. डाॅ. श्री. अविनाश मोहारिल,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी मैत्रेयीचे अभिनंदन केले.

मैत्रेयीला महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक सन्मा. श्री. कुवळेकर सर तसेच कनेडी हायस्कूल मध्ये संस्कृत तथा इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे तिचे वडील श्री. मकरंद आपटे आणि तिची आई सौ. मानसी आपटे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!