*कोंकण एक्सप्रेस*
*शिंदे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा तडकाफडकी राजीनामा*
*वेंगुर्ले:प्रतिनिधी*
माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वालावलकर यांच्या या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या वालावलकर यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेसमोर संघटनात्मक आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाकडून अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात आहे.

