*कोंकण एक्सप्रेस*
*श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचवावा- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*
*सिंधुदुर्गनगरी*
शिख धर्माचे ९ वे गुरू, ‘हिंद-की-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्यात विविध गौरवशाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांनी १७ व्या शतकामधील तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूध्द आवाज उठवून धर्म स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देवून भारताच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांचे शहिदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांच्या यशस्वी नियेाजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, पोलिस उपअधीक्षक श्रीमती खाडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहासिलदार चैताली सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या शहीदीच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, निवासी शाळा, शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी काढण्यात याव्यत, घोषवाक्य, निबंध स्पर्धा तसेच माहितीपट बनवावेत. सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत सिनेमागृहात प्रदर्शीत करण्यात करावे. सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल प्रचार रथ, संत प्रवास वाहने, जागरण, प्रचार व प्रसार समित्या यांच्यामार्फत गुरू तेग बहादुर आणि त्यांच्या परिवाराच्या शहीदीचा इतिहास जनमानसात पोहचवावा असेही त्या म्हणाल्या.
‘हिंद-दी-चादर’च्या अनुषंगाने जिल्ह्यात १० फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ‘जिल्हास्तरीय आयोजन व व्यवस्थापन समिती’ गठित करण्यात आली आहे.

