*कोंकण एक्सप्रेस*
*कविता, कथा व निबंधांनी भरले नवदुर्गा विद्यालयाचे साहित्य संमेलन..*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
धी.बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांच्या अंतर्गत कार्यरत नवदुर्गा माध्यमिक विद्यालयात सन २०२५–२६ साठी आयोजित १७ वे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.
या साहित्य संमेलनाचे मुख्य अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी आणि साहित्यिक अमित राणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. तर कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक व साहित्यिक सतीश धर्णे यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित या संमेलनात विद्यार्थ्यांनी कविता, कथा, निबंध व भाषण यांद्वारे आपली सृजनशीलता प्रभावीपणे सादर केली.
कार्यक्रमाला शालेय समितीचे मान्यवर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यामध्ये मिलिंद प्रतापराव तोरसकर (अध्यक्ष), सौ. रश्मी मिलिंद तोरसकर (सचिव), नंदकुमार नारायण नाईक (सहसचिव), सौ. उज्वला पारयेकर (प्र. मुख्याध्यापिका) तसेच इतर कार्यकारणी सदस्य प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अमित राणे यांनी विद्यार्थ्यांना निर्भीडपणे व्यक्त व्हावे, साहित्याच्या माध्यमातून विचारांची उंची वाढवावी तसेच वाचन–लेखनाची आवड सातत्याने जोपासावी, असे प्रेरणादायी आवाहन केले. संमेलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रचनांना उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी–विद्यार्थिनी व पालकवर्ग यांचे सहकार्य मिळाले. एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आणि त्यांच्या सर्जनशीलतेला दिशा देणारा ठरला.

