*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघाच्या दिनदर्शिकेचे अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते प्रकाशन : जिल्ह्यावासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ मुंबई या संस्थेच्या गेल्या 41 वर्षातील प्रथमच प्रकाशित केलेल्या पहिल्याच सन 2026 दिनदर्शिकेचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सिंधुदुर्ग वासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संस्था उभी राहिली असून आजतागायत मालवणी माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने झटत आहे.
या दिनदर्शिका प्रकाशनवेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष गावकर, उपाध्यक्ष प्रताप परब, सचिव भरत गावडे, खजिनदार दत्ताराम परब, सदस्य विजय लाड, विजय केसरकर, नारायण घाडीगावकर, उप सचिव प्रसाद तारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ – मुंबई, या संस्थेची स्थापना दि. १ जानेवारी १९८४ रोजी सिंधुदुर्ग वासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाली. संस्थेचे मुख्य संस्थापक रवी सामंत यांच्या अथक परिश्रमातून ही संस्था उभी राहिली. ती आजतागायत मालवणी माणसांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटत आहे. एकीचे बळ मोठे असते, या अर्थाने आणि त्यासाठीच मुंबईस्थित जिल्ह्यातील जास्तीत जास्त चाकरमान्यांनी संस्थेचे सभासद होणे आवश्यक आहे, असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष गावकर यांनी व्यक्त केले.
या वर्षी संस्थेच्या वतीने प्रथमच दिनदर्शिका २०२६ प्रकाशित करत आहोत. दिनदर्शिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा मानस आहे. या कार्यात आपला सर्वांचा हातभार लागावा, असे मनोमन वाटते. संस्थेने बरीच सामाजिक कार्ये केली आहेत. ती सर्व कामे येथे नमूद करणे शक्य नाही, तरी त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम असा आहे की, आपण दरवर्षी गणपतीनिमित्त सिंधुदुर्गवासियांसाठी मोफत बस सोडतो. संस्थेची भविष्यातील उद्दिष्ट्ये खूप मोठी असून सर्व सिंधुदुर्ग वासियांचे सहकार्य महत्वाचे आहे.

