*कोंकण एक्सप्रेस*
*अभ्यासात यशस्वी होण्यासाठी मनाची एकाग्रता महत्त्वाची : डॉ. रूपाली घाडी*
*साळशी येथे माध्यमिक विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात*
*शिरगाव : संतोष साळसकर*
आज अनेक मुले अभ्यासात मागे पडताना दिसतात. यासाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक असून, मनाची एकाग्रता महत्वाची आहे. आपल्या वागणुकीतून आई-वडिलांना अभिमान वाटेल असे घडले पाहिजे. मुलांना सक्रिय, आत्मविश्वासी व सकारात्मक बनवणे ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. योग्य वेळी प्रेरणा दिल्यास मुले अभ्यासाबरोबरच जीवनातही आत्मविश्वासाने पुढे जातात, असे प्रतिपादन डॉ. रूपाली घाडी यांनी साळशी येथे केले.
त्या माध्यमिक विद्यामंदिर, साळशी प्रशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या तसेच माजी विद्यार्थिनी म्हणून बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की,अभ्यासावर मन एकाग्र ठेवण्यासाठी श्वासावर आधारित ऊर्जेवर काम केल्यास ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक विचारांमुळे अभ्यासातील कार्यक्षमता सुधारते.
यावेळी सन २०२४–२५ या शैक्षणिक वर्षातील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ही बक्षिसे साळशी गावचे सुपुत्र व माजी मुख्याध्यापक विजय गावकर यांनी आपले वडील स्व. अनंत गावकर यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी ठेवलेल्या रोख रकमेच्या व्याजातून दिली. तसेच सन २०२४–२५ चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार सुकन्या वायंगणकर हिला प्रदान करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी साळशी सरपंच वैशाली सुतार, शिक्षण प्रेमी किशोर लाड,संस्थाध्यक्ष सत्यवान सावंत, चेअरमन सत्यवान भोगले यानी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास साळशी सरपंच सौ. वैशाली सुतार, संस्था अध्यक्ष सत्यवान सावंत, उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, स्कुल कमिटी चेअरमन सत्यवान भोगले, शिक्षणप्रेमी किशोर लाड, संस्था पदाधिकारी, माजी जि. प. सदस्य सुनील गावकर, वैभव साळसकर, निलेश गावकर, मंगेश साळसकर, चाफेड पोलीस पाटील संतोष सावंत, साळशी पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, मुख्याध्यापक संजय मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वप्निल भरणकर यांनी मानले. यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली व कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

