*कोंकण एक्सप्रेस*
*तोंडवळी तळाशिल येथे सर्फ फिशिंग स्पर्धा*
*कोंकण एक्स्ट्रीम अँगलर्सतर्फे आयोजन*
*मालवण (प्रतिनिधी) :*
कोंकण एक्स्ट्रीम अँगलर्स यांच्या वतीने दि. २० व २१ डिसेंबर रोजी तोंडवळी तळाशिल समुद्र किनाऱ्यावर भव्य “सर्फ फिशिंग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून १२० हून अधिक अँगलर्स या स्पर्धेत सहभागी झाले असून, रील व रॉडच्या सहाय्याने गळाने मासे पकडण्याच्या कौशल्याची ही स्पर्धा आहे.
स्पर्धा एकूण तीन सत्रांमध्ये खेळवली जाणार आहे. दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या दोन सत्रांत, तर दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १ या सत्रात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत पकडलेल्या माशांच्या प्रजातींनुसार गुणांकन करण्यात येणार असून, माशाची लांबी मोजून त्यानुसार गुण (पॉईंट्स) संबंधित स्पर्धकाला देण्यात येणार आहेत. या गुणांच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स, द्वितीय पारितोषिक ४०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स
तृतीय पारितोषिक ३०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स तसेच पहिला कॅच, जास्त कॅच, तसेच महिला स्पर्धकांसाठी विशेष बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेमुळे कोकणातील सर्फ फिशिंगला चालना मिळत असून, साहसी खेळप्रेमी अँगलर्ससाठी ही स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

