वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मतदानाची आकडेवारी चार टक्क्याने घरसली

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मतदानाची आकडेवारी चार टक्क्याने घरसली

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मतदानाची आकडेवारी चार टक्क्याने घरसली*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण १० हजार ११५ मतदारांपैकी ७ हजार ५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ७४.२९ टक्के मतदान झाले. सन २०१६ च्या निवडणुकीसाठी एकूण ७८ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत चार टक्क्यांनी मतदानाची आकडेवारी घसरल्याने कमी झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होईले २१ तारीखच्या निकालाने स्पष्ट होईल.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक पदांसाठी आज मतदान प्रक्रिया घेण्यात आली. मतदानासाठी १६ केंद्रे निश्चित करण्यात आली होती. आज सकाळी ७.३० ते दुपारी ११.३० वाजेपर्यंत २५.२ टक्के, दीड वाजेपर्यंत ४१.९७ टक्के, दुपारी साडेतीनपर्यंत ५७.८० टक्के तर सायंकाळी ५.३० वाजता एकूण ७४.२९ टक्के मतदान झाले. यात ४ हजार ८७१ पैकी ३ हजार ७०४ पुरूष मतदारांनी तर ५ हजार २४४ पैकी ३ हजार ८१० स्त्री मिळून एकूण ७ हजार ५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
सामान्य मतदारांसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींनीही उत्स्फूर्तपणे मतदान केले. दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे तसेच भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे येऊन भाजपाच्या मतदान बूथवर भेटी देत आढावा घेतला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष पपू परब यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्·ाभूमीवर राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांकडून ठिकठिकाणी बुथ लावण्यात आले होते. या बुथवर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार तसेच अपक्ष उमेदवार त्यांचे हितचिंतक यांची गर्दी दिसून आली. शहरात शिंदे सेनेकडून सचिन वालावलकर हे सकाळपासून प्रत्येक बुथवर आढावा घेत होते. तर भाजपाकडून जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सुद्धा शहरात ठाण मांडून होते.
पोलिस प्रशासनाच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी ·ोता खाडे यांनी शहरातील मतदान केंद्रांवर भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी उपस्थित होते. या निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, गेले काही दिवस सर्व उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी, अपक्ष उमेदवारांनी उत्साहात प्रचार यंत्रणा राबविली होती. निवडणुकीचा निकाल ऐण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. परंतु, उद्या जाहीर होणारा निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला होणार असल्याचे समजताच सर्वांमध्ये नाराजीचे सूर उमटले. या निर्णयामुळे 15 ते 17 दिवसांवर उत्स्कुता ताणली गेली आहे.
चौकट – प्रभाग क्रमांक 9 मधील समाज मंदिर, आनंदवाडी येथे मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदानासाठी आलेल्या संतोष वसंत वेंगुर्लेकर यांना त्याच नावाची दोन व्यक्ती असल्याने मतदार अधिका-यांनी त्यांना तब्बल तीनवेळा मतदान केंद्रावर येऊनही संबंधित अधिकारी वर्गाने मतदानाचा हक्क नाकारला. दोन्ही नावाच्या व्यक्ती एकाच वेळी आल्यावर मतदान करायला देणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले.
याबाबत तेथे असलेल्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविले. त्यानंतर उमेदवारांनी सायंकाळी चौथ्यावेळी मतदार संतोष वेंगुर्लेकर यांना बोलावून घेऊन त्यांना मतदान करण्यास दिले. तसेच सुप्रिया सुभाष जाधव या नावाच्या दोन मतदार होत्या. त्यांनाही दोन्ही एकत्र आल्यानंतर मतदान करायला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!