*कोंकण एक्सप्रेस*
*रेल्वेचं तिकीट बुक करताय? मग ‘हा’ नवा नियम जाणून घ्याच..नाहीतर तुमच्या लहान मुलांना मिळणार नाही सीट*
भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांसाठी स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय ठरते. ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्या जवळ आल्या की शाळांची हिवाळी सुट्टी सुरू होते आणि कुटुंबीय पर्यटनस्थळांकडे रेल्वेने प्रवास करतात. अशा वेळी पालकांना मुलांसाठी तिकीट नियम माहित असणे गरजेचे आहे. IRCTC च्या नियमांनुसार, मुलांचे वयानुसार तिकीट दर ठरतात. चला हे नियम सोप्या भाषेत समजून घेऊया
५ वर्षांखालील मुले
ही मुले पूर्णपणे मोफत प्रवास करू शकतात.. त्यांना तिकीट घेण्याची गरज नाही, पण स्वतंत्र बर्थ (झोपण्याची जागा) मिळणार नाही. जर पालकांना मुलासाठी स्वतंत्र बर्थ हवी असेल, तर त्यांना पूर्ण प्रौढ तिकीटाचा दर द्यावा लागेल. रेल्वे मंत्रालयाच्या ६ मार्च २०२० च्या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की, ५ वर्षांखालील मुलांना मोफत नेले जाईल, पण बर्थ मागितले तर प्रौढ दर आकारला जाईल. ही सुविधा प्रवाशांच्या मागणीवरून दिली गेली आहे.
५ ते १२ वर्षांखालील मुले
या वयोगटातील मुलांना अर्धे तिकीट (चाइल्ड फेअर) लागते, पण स्वतंत्र बर्थ किंवा सीट नको असेल तर..जर बर्थ हवी असेल, तर पूर्ण प्रौढ तिकीट घ्यावे लागेल. हे नियम IRCTC च्या ऑनलाइन बुकिंगमध्येही लागू होतात.
१२ वर्षांवरील मुले
यांना पूर्ण प्रौढ तिकीट अनिवार्य आहे, मग बर्थ असो वा नसो. हे नियम पालकांना प्रवास आरामदायी करतात. उदाहरणार्थ, लहान मुलांसह लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवास करताना बर्थ मिळाल्यास आराम मिळतो. रेल्वेने सांगितले की, प्रवाशांच्या मागणीवरून ५ वर्षांखालील मुलांसाठी बर्थ बुकिंगचा पर्याय दिला आहे. नको असेल तर पूर्वीप्रमाणे मोफत प्रवास होऊ शकतो ” सुट्टीत ट्रेन तिकीट लवकर बुक करा, कारण गर्दी वाढते. IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर नियम तपासा.

