*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी*
*नवी दिल्ली*
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरु असलेल्या वादाला आता निर्णायक वळण मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारपासून या प्रकरणावर अंतिम सुनावणी सुरू करणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती.
या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचा आरोप आहे की आयोगाचा निर्णय पक्षपाती आणि असंवैधानिक आहे, त्यामुळे तो रद्द करण्यात यावा.
मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकरण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निकाली काढण्याचा न्यायालयाचा मानस आहे.
त्यामुळे या
आठवड्यापासून खंडपीठ दोन्ही बाजूंच्या अंतिम युक्तिवादांना ऐकून घेणार आहे. आवश्यक असल्यास सलग सुनावणीही घेतली जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणासोबतच शिंदे गटातील आमदारांच्या पात्रते संदर्भातील याचिकेवरही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबरोबरच ‘गद्दार आमदारांच्या पात्रतेचा’ अंतिम निकालही आता जवळ आल्याचे संकेत आहेत.

