*कोंकण एक्सप्रेस*
*कृषी विभागाच्या शेतकरी परदेश अभ्यास दौर्यांसाठीचे अनुदान आता दोन लाख दुप्पटीने वाढ ; -भाई चव्हाण*
*कणकवली ः संजना हळदिवे*
यंदाच्या वर्षी कृषी विभागाच्या परदेशी अभ्यास दौर्यासाठी राज्यभरातील १७० शेतकर्यांची निवड झाली होती. मात्र शासनाच्या केवळ एक लाख रुपये अनुदानाच्या तुलनेने या दौर्यांचा एकूण खर्च तिप्पट चौपट झाल्याने सर्वंच शेतकर्यांनी दौर्यांमध्ये सहभागी होण्यास असमर्थता दर्शविली. यासंदर्भात आम्ही प्रसार माध्यमांतून आवाज उठविल्याने शासनाने अलिकडेच अनुदानाची मर्यादा दुप्पट म्हणजे रुपये २ लाख केली आहे, अशी माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्याच्या कृषी विभागामार्फत २०१२ पासून परदेशांतील शेती बागायतींमधिल विकसित आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ राज्यातील शेतकर्यांना व्हावा, या उद्देशाने ६ गटांमध्ये विविध शेतकरी परदेश अभ्यास दौर्यांचे गेली १३ वर्षें आयोजन करण्यात येते. मात्र त्यासाठी रुपये १ लाख एवढे अनुदान मंजूर करण्यात येत होते. त्यामध्ये एकूण होणार्या खर्चाच्या निम्मे अनुदानच देण्याची तरतूद होती.
यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये ३६ जिल्ह्यांतून १७० शेतकर्यांची सोडत पद्धतीने निवड झाली होती. मात्र या दौर्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ट्रॅव्हल एजन्सीने ६ गटांतील दौर्यांसाठी रुपये ३.५ लाख ते ४.२५ लाख एवढ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले. परिणामी या शेतकर्यांना स्वत:च्या पदरचे रुपये २.५ लाख ते ३.२५ लाख खर्च करणे अवघड असल्याने सर्वांनी या दौऱ्यात सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केली.
यासंदर्भात या दौऱ्यात निवड झालेले शेतकरी, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसार माध्यमांमध्ये वस्तुस्थिती मांडून या अनुदानात दुप्पटीने वाढ करावी, अशी मागणी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन राज्य कृषी विभागाने राज्य शासनाकडे या अनुदानात दुप्पटीने वाढ करावी, असा प्रस्ताव पाठविला होता.
सुदैवाने १४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार या १३ वर्षांत वाढलेले विमान तिकीट, निवास, अन्य अनुवाशिक दर, तसेच डाॅलर , युरो विनिमय दरात झालेली वाढ आदी बाबींचा विचार करून हे अनुदान रुपये २ लाख एवढे करण्यात आले आहे. त्यामुळे या दौर्यांत सहभागी होण्यास असमर्थता दर्शविलेल्या शेतकर्यांपैकी बहुतांश शेतकर्यांनी आता दौर्यांत सहभागी होण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
*चौकट*
*शेतकर्यांना सरसकट २ लाख रुपये द्यावेत*
शासन निर्णयानुसार शेतकर्यांना एकूण खर्चाच्या निम्मे अनुदान देय राहील, असे नमूद आहे. यंदाच्या वर्षी दोन गटांचा नियोजित खर्च रुपये २.८० लाख एवढा आहे. त्यामुळे त्यांना फक्त रुपये १.४० लाख एवढेच अनुदान देय राहिल. अपवाद सोडले तर बहुतांश शेतकरीवर्ग हा गरीब असतो. त्यामुळे तो गटांची निवड करताना कमी खर्चाच्या गटाची निवड करतो. तरी सर्वांना मंजूर असलेले २ लाख रुपयाचे अनुदान सरसकट देण्यात यावे, अशी रास्त मागणी निवड झालेले शेतकरी करीत आहेत.
_____-_____-____-____-

