*कोंकण एक्सप्रेस*
*अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य : डॉ. इंद्रजीत मोहिते राज्यस्तरीय पुरस्कार वितरण*
*सिंधुदुर्ग (तळेरे), दि. 15 :*
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य सुरू आहे. त्यांचे हे कार्य अनुकरणीय आणि दखलपात्र आहे. या ट्रस्टचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सारख्या डोंगराळ भागात केलेले शैक्षणिक कार्य तर सर्वात महत्वाचे असल्याचे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत यशवंतराव मोहिते यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण कराड येथे आयोजित केलेल्या समारंभात बोलत होते.
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे शैक्षणिक कार्य सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह अनेक जिल्ह्यात अत्यंत जबाबदारीने आणि तेवढ्याच तळमळीने केले जाते. यावेळी बोलताना डॉ. मोहिते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महान थोर पुरुषांच्या विचारानुसार आपली वाटचाल ठेवावी. आज महान थोर पुरुषाच्या इतिहासाचा विसर पडलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वाला व कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही. प्रत्येकाच्या घरात एक अहिल्या जन्माला आली तर कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी ट्रस्टने जपला. प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवून अहिल्यादेवी ट्रस्टने सामाजिक व शैक्षणिक चळवळीला बळ दिले आहे.
कोरोना काळातील शैक्षणिक कार्य उल्लेखनीय (चौकट)
गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये डोंगरदऱ्यामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील जंगलातील व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम प्रेरणादायी आहे. बहुजन समाज आजही शिक्षणापासून वंचित आहे तो शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी अहिल्यादेवी ट्रस्ट जनजागृती करून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहे.
कोणत्याही समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण असेल तरच विकास होऊ शकेल.
यावेळी डॉ. अशोक राव गुजर (संस्थापक अध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॉलेज विद्यानगर कराड) यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार, राजेंद्र अण्णासाहेब डांगे (गव्हर्निंग कौन्सिल मेंबर अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा) यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार, श्री सचिन बुरुंगले (चेअरमन हर्ष लॉजिस्टिक्स कंपनी नवी मुंबई) यांनी उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
अहिल्यादेवी ट्रस्टने महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित केला. त्यामध्ये १६२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ४१ राज्यस्तरीय खेळाडू यांना क्रीडा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. २३ राष्ट्रीय खेळाडूंना क्रीडामानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. असे एकूण २२६ विद्यार्थ्यांना एकाच वेळी सन्मानित करण्यात आले. अहिल्यादेवी ट्रस्टने त्रि शताब्दी जयंतीच्या निमित्ताने कराड येथे १४१ महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुणे येथे ९० महिलांना सन्मानित केले व मुंबई येथे १४१महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा कुमार देवकाते यांनी तर आभार एमडी दडस यांनी मानले. याप्रसंगी डॉ अशोकराव गुजर, एडवोकेट राजेंद्र डांगे, प्राचार्य भरत बल्लाळ, प्रा. रवींद्र कोकरे, प्रा. साहेबराव चौरे, धोंडीराम जाधव, संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे, भुमिअभिलेख अधिकारी उल्हासराव वाघमोडे, मलकापूरचे माजी नगर अध्यक्ष आबासाहेब गावडे, कृषिरत्न पुरस्कार विजेते विश्वासराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शितल काकडे, कैलास काकडे, योगेश कुरले, अंशुमन काकडे, राजवर्धन भोसले, आदित्य भोईटे, सार्थ झेले, तन्मय खरात, आनंदराव कचरे, रामचंद्र पुकळे, सतिश थोरात, महेश जाधव, प्रभाकर कवळे, उमेश हिवरे, उत्कर्ष वाघमोडे, रोहित येडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

