*कोंकण एक्सप्रेस*
*शिरोडा समुद्रात बेपत्ता दोन्ही मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी सापडले*
*इरफान कित्तूर चा मृतदेह केळुस येथे तर जाकीर मणियार चा मृतदेह वेंगुर्ले समुद्रात आढळला*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
शिरोडा वेळागर येथील समुद्रात घडलेल्या दुर्घटनेमध्ये ७ पर्यटक पाण्यात बुडाले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी ३, शनिवारी २ आणि आज रविवारी २ मृतदेह वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले समुद्र व केळुस समुद्रात आढळून आले. पोलीस व प्रशासनाच्या मार्फत सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर यश आले.
कुडाळ गुढिपूर येथील मणीयार कुटुंब आणि बेळगाव येथील कित्तूर कुटुंब पर्यटनासाठी शुक्रवार ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी शिरोडा समुद्रकिनारी आले होते. यापैकी ९ जण समुद्राच्या पाण्यात मौज मजा करण्यासाठी उतरले होते. मात्र समुद्राच्या एका मोठ्या लाटेमुळे हे सर्वजण पाण्यात वाहून गेले. त्यावेळी पाच जणांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. परंतु बाहेर काढलेल्या ५ पर्यटकांपैकी इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष १७ रा. लोंढा, बेळगाव आणि इमरान अहमद मोहम्मद इसाक कित्तूर वय वर्ष ५५ रा. लोंढा, बेळगाव हे सुदैवाने बचावले होते. मात्र फरहान इरफान कित्तूर, वय ३४, रा. लोंढा, बेळगाव, श्री इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा, बेळगाव आणि श्रीमती नमीरा आफताब अख्तर वय १६, रा अल्लावर, बेळगाव यांचा मृत्यू झाला होता. तर उर्वरित चार पर्यटक पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले होते. पोलीस प्रशासनाकडून आणि मत्स्य विभागाच्या द्रोण द्वारे त्यांची समुद्रात शोध मोहीम सुरू होती. मात्र उशिरापर्यंत ते सापडले नव्हते.
काल शनिवारी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी ₹ फरहान मोहम्मद मणियार, वय २५, रा. कुडाळ गुडीपूर याचा मृतदेह सागरतीर्थ समुद्रकिनारी मिळाला, तर इक्वान इमरान कित्तूर, वय १५ रा. लोंढा, बेळगाव याचा मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी आढळून आला होता. या पाचही मृतदेहांचे रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान आज रविवारी तिसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम सुरू करताना दोन्ही मृतदेह समुद्रात दिसून आल्याचे वेंगुर्ला पोलिसांनी जाहीर केले. इरफान मोहम्मद इसाक कित्तूर , वर ३६ वर्ष, रा. बेळगाव याचा मृतदेह सकाळी केळुस, निवती, येथे समुद्रात आढळून आला. निवती पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कांदळगावकर, सोनसुरकर, कदम, गोसावी, कुंभार, यांनी हा मृतदेह बाहेर काढला. तर जाकीर निसार मणियार, वय १३ वर्ष रा. कुडाळ याचा मृतदेह नवाबाग येथून वेंगुर्ले समुद्रामध्ये आत सुमारे ६ किलोमीटर येथून वेंगुर्ला पोलीस ठाणे अधिकारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर, राठोड, व अंमलदार कदम, सरफदार, राऊळ, तांबे, जोसेफ, सरमळकर, देसाई, मांजरेकर, परुळेकर यांनी बोटीने बाहेर काढलेली आहे. दोन्ही मृतदेहाची खात्री त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे. तसेच सदर शोध मोहीमसाठी मत्स्य विभागाचे ड्रोन वापरण्यात आले व महसूल प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

