अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ नाटक 14 रोजी दूरदर्शनवर

अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ नाटक 14 रोजी दूरदर्शनवर

*कोकण Express*

*अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ नाटक 14 रोजी दूरदर्शनवर*

*विकास तांबे यांची निर्मिती, रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शन, निलेश पवार यांचा अभिनय*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

घटनातज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कवी अजय कांडर यांनी ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लिहिली आणि ती बहुचर्चितही झाली. या कवितेचे नाट्यरूप रंगमंचावर आले असून आता हे नाटक मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने स्वीकारले आहे. त्याचा पहिला प्रयोग बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी सायं. 5 वा. सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असल्याची माहिती या नाटकाचे निर्माते विकास तांबे, दिग्दर्शक रघुनाथ कदम आणि अभिनेते निलेश पवार यांनी येथे दिली.
‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लोकवाड:मय गृह प्रकाशन मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आली. प्रकाशनापूर्वीच पहिली आवृत्ती संपण्याचा इतिहास मराठी साहित्यात या कवितेने रचला. त्यानंतर वर्षभरात एकूण तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या.याच दरम्यान विकास तांबे यांच्या कबीर आर्ट नाट्यसंस्थेतर्फे रघुनाथ कदम दिग्दर्शित आणि निलेश पवार अभिनीत या कवितेचं नाटक ‘युगानुयुगे तूच’ याच नावाने रंगमंचावर आले. आणि त्याचा पहिला प्रयोग सुमारे साडेतीनशे प्रेक्षकांच्या उपस्थितीत मराठी भाषादिन 27 फेब्रुवारी रोजी येथील वसंतराव आचरेकर नाट्यगृहाच्या रंगमंचावर सादर झाला. याच प्रयोगाच्या दरम्यान दूरदर्शनच्या कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित यांनी कवी अजय कांडर यांच्याशी संपर्क साधून हे नाटक दूरदर्शनसाठी कराल का? विचारले. त्यानंतर सोमवार 5 एप्रिल रोजी या नाटकाचे चित्रीकरण मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओ करण्यात आले. व ते नाटक 14 एप्रिल रोजी प्रसारित करण्यात येणार असल्याचा प्रोमोही जाहीर करण्यात आला. हे नाटक दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होण्यासाठी नाट्य प्रयोगाला मान्यता देणारे दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज अगरवाल तसेच मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रम अधिकारी उमाताई दीक्षित, प्रज्योती मंदा, निवृत्त निर्माते शरण बिराजदार, सहायक संचालक कपिलकुमार धोरे तसेच राज्यश्री पंत, कॅमेरा विभाग प्रमुख प्रदीप चक्रवर्ती यांचे सहकार्य लाभले आहे.
सिंधुदुर्गच्या नाट्यचळवळीत रंगभूमीविषयी विपुल काम झालेले आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ते बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ अशा अनेक संस्थांनी यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.अशा पोषक वातावरणामुळे आता नवी पिढीही स्वतंत्रपणे सक्षम नाटक सिंधुदुर्गात सादर करू लागली असून त्याचाच प्रत्यय कबीर आर्ट या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या आणि पहिल्याच प्रयोगानंतर दूरदर्शनने स्वीकारलेल्या या ‘युगानुयुगे तूच’ या नाटकाच्या माध्यमातून येत आहे.
‘युगानुयुगे तूच’ या नाटकाविषयी बोलताना या नाटकाचे अभिनेते निलेश पवार म्हणाले, ‘युगानुयुगे तूच’ या काव्यात कवी कांडर यांनी सहज सोप्या भाषेत बाबासाहेब सर्वांचेच कसे आहेत हे सांगितले आहे. जे सर्वसामान्यांनाही समजू शकतील. त्याचे नाट्यरूपांतर झालं तर ते अधिक प्रभावीपणे अधिकाधिक लोकांपर्यंत जास्त परिणामकारक पोहोचू शकते या विचारातून या नाटकाचे निर्माते विकास तांबे यांनी हे नाटक रंगमंचावर आणले असून दिग्दर्शक कदम यांच्या अभ्यासू दृष्टीने आणि प्रयोगशील संगीतकार मकरंद कदम यांच्या प्रभावी संगीत साथीमुळे व व्यावसायिक रंगभूमीवरील प्रकाश योजनाकार संजय तोडणकर यांच्या नेमक्या प्रकाश योजनेमुळे हे नाटक रंगमंचावर सादर होत आहे. पहिल्याच प्रयोगानंतर दूरदर्शनने हे नाटक स्वीकारले हा सिंधुदुर्गच्या नाट्य चळवळीचा सन्मान आहे.हा प्रयोग उपग्रह वाहिनीतर्फे सह्याद्री वहिनी द्वारे देश-विदेशात ही पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!