*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगांवच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक दर्जाच्या उद्योजकांचे मार्गदर्शन*
*करिअर कट्टा आणि कर्ले महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार*
*शिरगांव | संतोष साळसकर*
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा आणि देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्यामध्ये २७ मे रोजी कोल्हापूर येथे सामंजस्य करार पार पडला.
कोल्हापूर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार झाला यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वर्षा मैंदर्गी, सांगलीच्या जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ.पूजा नरवाडकर, कर्ले महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संभाजी साटम, महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर उपस्थित होत्या.
करिअर कट्टा सोबत झालेल्या या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शंभरून अधिक जागतिक पातळीवरील उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र ग्लोबलच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले भारतीय विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असून, महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना जगभरातून तसेच देशातील मार्गदर्शक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व्यवसाय कसे उभे राहायचे, कंपनी कशी उभारायची यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सामजंस्य करारामुळे विद्यार्थ्यांना देश व राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षा, भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच बँकिंग क्षेत्र याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा फायदा शिरगांव दशकोशीसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार आहे म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाला सामंजस्य करार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, सर्व संस्थापदाधिकारी, संचालक, प्राचार्य समीर तारी यांनी करिअर कट्टाचे आभार मानले.