*कोंकण एक्सप्रेस*
*पुस्तके जगण्याची अनुभुती देतात ..बर्वे ग्रंथालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयावतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन केळकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. महेंद्र कामत यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरूदेव परूळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. कामत यांनी २३ एप्रिल हा संपूर्ण जगभरात ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. या दिनानिमित्त जगभर लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. पुस्तके जगण्याची अनुभुती देतात. पुस्तकामुळे अनेक विचारवंताना प्रेरणा मिळाली आहे. समाज वाचनाभिमुख करण्यासाठी ग्रंथालयांचे योगदान मोठे आहे. आजकल शहरातल्या ग्रंथालयांपेक्षा निमशहरी व ग्रामीण भागातली ग्रंथालये चांगली वाचकसेवा पुरवीत आहेत. असे सांगून त्यांनी बर्वे लायब्ररीच्या वाचक सेवेचे आणि राबवित असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डॉ. गणेश बांदकर, सचिव श्री सीताराम पाटील, संचालक सदस्य श्री दत्तात्रय जोशी, सौ. मधुरा कुबल, सांस्कृतीक समिती प्रमुख महेश खोत उपस्थित होते. ग्रंथालयाने खरेदी केलेल्या आणि देणगीद्वारे प्राप्त झालेल्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. ग्रंथालयाला रविंद्र गोडसे, धनाजी जाधव, राजेश शिवदास, अजित जाधव, दत्तात्रय जोशी, पुष्कर महाडिक सदानंद पवार, सुनेत्रा जोशी, इंद्रनिल ठाकूर यांनी ग्रंथदेणगी दिली होती.
ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. परूळेकर यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालयाचे सचिव श्री पाटील यांनी पुस्तक दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले व सदर ग्रंथप्रदर्शन २९ एप्रिल पर्यंत सर्वांसाठी खुले राहिल. तरी ग्रंथालयाच्या सर्व वाचकांनी याचा लाभ घ्यावा. असे सांगितले आणि कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे, ग्रंथ देणगीदारांचे व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. सचिन दहीबावकर, सौ. कामत्, मंदाकिनी गोडसे आदी उपस्थित होते.