*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणात स्मृतिलिला पुरस्कार वितरण सोहळा संपन्न*
*मालवण (प्रतिनिधी)*
सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आणि हडकर कुटुंबीयांच्या वतीने सौ. नंदिनी राजेश पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्वास दिल्या जाणाऱ्या स्मृतिलिला पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये क्रिकेटपटू पुरस्कार देवेंद्र रामचंद्र मांजरेकर यांना, व्हॉलीबॉल पुरस्कार शंकर (भाऊ) विनायक नामनाईक आणि मैत्री पुरस्कार उल्हास आत्माराम सरमळकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मालवण भरड येथील लिलांजली हॉल येथे स्मृतिलीला पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावर्षी या पुरस्काराचे पाचवे वर्ष होते. प्रारंभी कै. लीलाधर हडकर यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष व भंडारी समाजाचे नेते भाई गोवेकर यांनी पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, उद्योजक व प्रमुख वक्ते जॉन नोरोना सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवणचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनील नाईक मालवण स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री रामा शेटये, ज्येष्ठ क्रीडापटू देवदत्त उर्फ भाऊ हडकर आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र तळाशीलकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उदयोन्मुख क्रिकेटपटू पुरस्कार वैभव राजेश पवार (भंडारी हायस्कुल) याला देऊन गौरविण्यात आले. तसेच क्रिकेट खेळातील कामगिरीबद्दल गार्गी संजय जुवेकर, ऋतुजा संतोष वाक्कर, अनुष्का चंद्रशेखर आंबेरकर मैदानी खेळासाठी महिमा विशाल मोहिते, हर्षाली वेंगुर्लेकर, खोखो खेळासाठी सागर प्रमोद सावंत, टेबल टेनिस खेळासाठी वर्षा विलास परुळेकर, योगेश नितीन परुळेकर लौकिक हेमंत तळवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दिल्ली येथे परेड मध्ये सहभागी झालेला स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विद्यार्थी राहुल उदय चव्हाण, विज्ञान विषयातील कामगिरीबद्दल तेजस रामचंद्र केळूसकर, नेव्हलआर्किटेक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच नेवल आर्किटेक बहुमान मिळवणारा रविराज शंकर नार्वेकर याचाही सन्मान करण्यात आला. तसेच मालवण स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ क्रिकेटपटू म्हणून सतीश विठ्ठल गावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून आदित्य श्यामसुंदर वाककर, तेजस हेमंत मेस्त यांचा प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे जॉन नरोना यांनी ज्येष्ठ तसेच युवा खेळाडूंचा सन्मान करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, कै. लीलाधर हडकर यांच्या समवेत क्रिकेट हॉलीबॉल बॅडमिंटन आणि इतर खेळांमध्ये खेळलेले अनेक ज्येष्ठ खेळाडू असून आयोजकांनी ज्येष्ठ खेळाडूंसाठी पुरस्कार वाढवावेत असे सांगितले. डॉ. राहुल पंतवालावलकर यांनी खेळाडूंनी पहाटे लवकर उठून सराव करावा, फास्टफूड, जंकफूड पासून दूर राहावे, असे सांगितले. महेश जावकर उदयोन्मुख खेळाडूंनी आपल्या कामगिरीने मालवण शहराचे नाव देश पातळीवर गाजवावे असे सांगितले. भाई गोवेकर यांनी लीलाधर हडकर हे समाजकारण व क्रीडा क्षेत्रातील सर्वव्यापी असे व्यक्तिमत्व होते, त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यांच्या स्मृती निरंतर राहण्यासाठी स्मृतिलिला पुरस्कार हा कार्यक्रम उत्तरोत्तर यशस्वी व्हावा, अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व हडकर कुटुंबीय तसेच माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, राजा शंकरदास, अरविंद सराफ, श्रीकांत वेंगुर्लेकर, अजित गवंडे, भाऊ साळगावकर, बाळा सोनसुरकर, बाळू मुणगेकर, राजू आंबेरकर, सचिन आरोलकर, विष्णू कोरगावकर, नंदू देसाई, निळकंठ मालवणकर, जितू वाळके, जहीर शेख आदी व इतर उपस्थित होते.