*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणात पुढीलवर्षी भंडारी समाज भवन उभे राहण्यासाठी पुढाकार घेणार – आमदार कालिदास कोळंबकर यांची ग्वाही*
*भंडारी हितवर्धक समाजाच्या वतीने नागरी सत्कार संपन्न*
*मालवण : प्रतिनिधी*
देशात जे कोणाला जमले नाही ते भंडारी समाजाने करून दाखविले आहे. सर्व समाजाची भवने निर्माण झाली आहेत. भंडारी समाजाचे भवन अद्याप झालेले नाही. मात्र पुढील वर्षी मालवणात भंडारी समाजाचे भवन उभे राहण्यासाठी आराखडा, निधी जमा करण्यात आपला पुढाकार असेल. समाज बांधवांनी मोठ्या ताकदीनिशी भंडारी समाजाचे भवन उभे करूया असे प्रतिपादन येथील मालवणचे सुपुत्र व नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी मालवणात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केले.
मुंबई सारख्या महानगरातून सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मालवणचे सुपुत्र आमदार कालिदास कोळंबकर यांचा सत्कार सोहळा सकल भंडारी हितवर्धक समाजाच्या वतीने येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. व्यासपीठावर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, ज्येष्ठ समाजबांधव भाई गोवेकर, जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, हेमंत करुंगुटकर, मामा माडये, रवी तळाशीलकर, यतीन खोत, पूजा करलकर, अर्चना मिठबावकर, पल्लवी खानोलकर, ममता वराडकर, मिलिंद झाड, शिल्पा खोत, सुनील नाईक, अजिन गवंडे, भाई मांजरेकर, जयप्रकाश परुळेकर, प्रसन्न मयेकर वराडकर, शर्वरी पाटकर, जयमाला मयेकर, भाऊ साळगावकर,
अजित गवंडे, भाई मांजरेकर, जयप्रकाश परुळेकर, प्रसन्न मयेकर, मोहन वराडकर, शर्वरी पाटकर, जयमाला मयेकर, भाऊ साळगावकर, भाई सारंग, बाबल कवटकर, महेश जावकर यांच्यासह अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. कोळंबकर यांचा श्री. बांदिवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. कोळंबकर म्हणाले, भंडारी हा कधीही हाजी हाजी करून काही मिळविणारा नाही. मी कधीही हे केले नाही. त्यामुळे शाखाप्रमुख, नगरसेवक बनलो. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आमदार बनलो. आमदार म्हणून शेवटच्या स्तरावर जाऊन काम केले. गिरणी कामगार, पोलिसांना हक्काचे घर मिळवून दिले. गोरगरिबांची सेवा सातत्याने सुरू ठेवली. त्यामुळेच सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. सलग नऊ वेळा निवडून आल्याने त्याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली. आज देशात सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या आमदारांमध्ये मी प्रथम क्रमांकावर आहे. माझ्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. त्यामुळेच सर्वसामान्यांशी माझी नाळ जोडली गेली आहे. आज भंडारी समाज बांधवांनी माझा जो सत्कार केला. त्याबद्दल मी समाजाचा कायम ऋणी राहील. भंडारी समाजाचे भवन नाही अशी जी भावना बांधवांनी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षात मालवणात भंडारी समाजाचे भवन उभे राहण्यासाठी आपला पुढाकार असेल. सर्व समाज बांधवांनीही मोठ्या ताकदीने हे समाज भवन उभे करूया.
विधानसभेवर सलग नऊ वेळा कालिदास कोळंबकर हे निवडून गेले आहेत. त्यामुळे आताच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाईल असे श्री. बांदिवडेकर, श्री. पेडणेकर यांनी सांगितले. यावेळी भाई गोवेकर, महेश जावकर, रमण वायंगणकर, श्री. कीर, शिल्पा खोत यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक रवी तळाशीलकर यांनी केले. सुनील नाईक यांनी आभार मानले.

