*कोंकण एक्सप्रेस*
*वराड सोनवडेपार पुलाच्या कामाशी नारायण राणे आणि निलेश राणे यांचा काडीमात्र संबंध नाही- हरी खोबरेकर*
*मा.खासदार विनायक राऊत यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राणे कुटुंबाची धडपड*
*मालवण : प्रतिनिधी*
कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या सरंबळ सोनवडेपार वराड रस्त्यावर वराड येथे कर्ली खाडीवर बांधण्यात आलेले पूल हे २०१८ साली विनायक राऊत यांनी खासदार असताना मंजूर करून घेतले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत १० कोटी ५९ लाख रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले होते. २२ ऑक्टोबर २०१८ रोजी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मा. खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व मा. आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. पुलाच्या कामाची वर्कऑर्डर देखील ०५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाली आहे.मात्र सी.आर. झेड. च्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रेंगाळले होते. त्यासाठी देखील विनायक राऊत व वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी दूर करून काम सुरु करून घेतले होते.

२४ एप्रिल २०२३ रोजी विनायक राऊत व वैभव नाईक यांनी वराड पुलाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करून काम पूर्ण करण्यास होणार विलंब आणि येणाऱ्या अडचणीबाबत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला होता. विनायक राऊत व वैभव नाईक यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून वराड सोनवडेपार पुलाचे काम आता पूर्ण झाले असून पुलाचे लोकार्पण करून पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राणे कुटूंबियांची धडपड सुरु आहे. मात्र या कामाशी नारायण राणे आणि निलेश राणे यांचा काडीमात्र संबंध नाही.असेल तर त्याचे कागदोपत्री पुरावे त्यांनी द्यावेत.
विनायक राऊत गेली ६ वर्षे या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सीआरझेड आणि पर्यावरण संबंधीच्या परवानग्या त्यांनी दिल्ली व मुंबईवरून मिळविल्या आहेत.त्याचबरोबर विनायक राऊत यांनी २० पेक्षा जास्त वेळा वराड पुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून कामावर लक्ष ठेवले होते. मात्र आता श्रेय घेणारे नारायण राणे त्या पुलावर किती वेळा गेले? त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या कामाचे लोकार्पण राणे कुटुंबीयांनी करण्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर प्रलंबित कामे त्यांनी मंजूर करून ती पूर्ण करून दाखवावीत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.

