*कोकण Express*
*स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांनी सजग बनावे ; मनोज रावराणे*
*इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज रहावे, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करताना योग्य मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांना अधिक सजग बनवावे असे आवाहन कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी व्यक्त केले. कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करताना योग्य मार्गदर्शन मिळावे. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून आणि कणकवली पंचायत समिती आणि तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या नियोजनातून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा कणकवली तालुक्यातील फोंडा, तळेरे, हुमरठ, कणकवली आणि कनेडी या पाच प्रभागात आयोजित करण्यात आली आहे.
३ मार्च, १० मार्च आणि १७ मार्च या तीन दिवशी ही मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळांत कणकवली तालुक्यातील सर्व शाळांतील इयत्ता पाचवीतील परीक्षेला प्रविष्ठ सुमारे २५० विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यानंतर २६ मार्च रोजी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. कणकवली पंचायत समिती सातत्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम राबवत आहे. शिक्षण आपल्या दारी, माझी शाळा-माझा किल्ला आणि आता शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास पंचायत समिती सदस्या सुजाता हळदीवे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी फोंडा प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर गवस, केंद्रप्रमुख सूर्यकांत चव्हाण, तज्ञ मार्गदर्शक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाचे तालुक्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमधून स्वागत आणि समाधान व्यक्त केले जात आहे.