*कोकण Express*
*एसटी चालकाला मारहाणप्रकरणी भरणी येथील तिघांची निर्दोष मुक्तता…!*
*आरोपींच्यावतीने अँड. उमेश सावंत यांनी काम पाहिले…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली – एस.टी. चालकाला कर्तव्यावर मारहाण केल्याप्रकरणी भरणी येथील अनिल बागवे, दीपक राऊळ व अशोक राऊळ यातिघांची तदर्थ सत्र न्यायाधीश सौ. वर्षाराणी पत्रावळे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अँड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
दि .१४ जानेवारी २०१४ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कणकवली – आयनल ही वस्तीची गाडी घेऊन कणकवली आगाराचे चालक चंद्रकांत दिनकर राणे ( रा. जानवली ) हे जात होते. सदरची गाडी भरणी येथील अरुंद पुलावर समोरून आलेल्या ओमनी व्हॅनला पुढे जाण्यास जागा दिली नाही, या कारणावरून झालेल्या वादातून बस नानेवाडी बसथांब्यावर प्रवासी उतरवत असताना मागून आरोपी अनिल बागवे व अन्य आरोपींनी ओमनी घेऊन येत चालकाचा दरवाजा उघडून त्याला रस्त्यावर पाडले. तसेच त्याला शिवीगाळ व जबर मारहाण केली. त्यामुळे चालक राणे गंभीर जखमी झाले होते. याबाबत राणे यांनी कणकवली पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३५३ , ३३२ , ३४१ , ५०४ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले होते. मात्र , घटनेवेळी राणे हे लोकसेवक म्हणून शासकीय कर्तव्यावर होते याबाबत सरकार पक्षातर्फे कोणताही पुरावा देण्यात आला नाही. स्वतंत्र साक्षीदार तपासण्यात आले नाहीत. तसेच तपासातील त्रुटी, साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती यामुळे न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

