कणकवलीतील हायवेवरील अतिक्रमणांची संदेश पारकर यांना आत्ताच जाग का आली?

कणकवलीतील हायवेवरील अतिक्रमणांची संदेश पारकर यांना आत्ताच जाग का आली?

*कोकण Express*

*कणकवलीतील हायवेवरील अतिक्रमणांची संदेश पारकर यांना आत्ताच जाग का आली?*

*मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचा सवाल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवलीतील उड्डान पुलाचे काम, सर्व्हिस रोडचे काम ड्रेनेजचे काम, फुटपाथ, विद्युत लाईन, बॉक्सेल ब्रिजची कामे, आरओडब्ल्यू लाईन मारणे ही कामे गेली 3 वर्षे सुरु होती. त्यावेळीच ती निकृष्ट कामे उत्कृष्टपणे करुन घेण्याची जबाबदारी शिवसेनेचे कार्यकर्ते श्री.संदेश पारकर वगैरेची होती. परंतु आता सर्व कामे पूर्णत्वाकडे चाललेली असताना आणि त्यांचे शिवसेना खासदार विनायक राऊत व पालकमंत्री मा.उदय सामंत यांनी येत्या 2 महिन्यात उड्डान पुलाचे काम पूर्ण करुन हायवेवरील वाहतूक सुरु करण्याचे ठरविले असताना श्री.संदेश पारकर यांना हायवेवरील अतिक्रमणांची आताच जाग का आली? असा परखड सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.राजन दाभोलकर यांनी केला आहे.
एकिकडे श्री.संदेश पारकर हे वृत्तपत्रांतून जाहिर करतात की, हायवेचे अधिकारी वर्ग पालकमंत्र्यांचे ऐकत नाहीत. दुसरीकडे खासदार पुलावरील वाहतूक सुरु करण्यासाठी आग्रह धरतात आणि शिवसेनेचे शिवसैनिकांना घेऊन संदेश पारकर हे उड्डान पुलावरील वाहतूक रोखून प्रसिद्धीचा स्टंट करतात. यामध्ये शिवसेनेचे नेते, पालकमंत्री आमदार, खासदार व कार्यकर्ते यांच्यात कोणताही समन्वये राहिलेला नाही. जो तो आपणच जनतेसाठी काहीतरी करीत असल्याचा आव आणून प्रसिद्धी घेत आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुर्देंव आहे.
कणकवलीतील हायवे उड्डान पूल व सर्व्हिस रोडच्या कामाच्या सुरुवातीला आर ओडब्ल्यू लाईन लाल फुल्यांनी निश्चित करुन अनेक बांधकामे पोलीस बंदोबस्तात अर्धवट तोडण्यात आली. त्यांचे पुर्ण पैसे मालकांना मिळाले. परंतु अर्धवट पाडलेल्या धोकायदायक ईमारतीमध्ये दुरुस्ती करुन आणि नव्याने बांधकामे करुन लोकांनी अतिक्रमणे केली. तेव्हा संदेश पारकर मूग गिळून गप्प का बसले होते? गेली 3 वर्षे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न निकाली का काढू शकले नाहीत? कणकवलीतील हायवेवरील पटवर्धन चौक, जानवली, हळवल तिठा, वागदे पेट्रोल पंप येथील सर्व सर्कल्स रद्द का केली? परिणामी कणकवलीतील वाहतूक धोकादायक बनली आहे. भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता असल्याने सर्व्हिस रोडवर काही ठिकाणी स्पीड ब्रेकर्स बसविण्याची नितांत आवश्यकता आहे.
गेले काही दिवस हायवेच्या निकृष्ट कामांबाबत संदेश पारकरांनी प्रसिद्धीचा विडा उचलला आहे. त्याऐवजी मनसेप्रमाणे हायकोर्टात दाद मागून दाखवावी तरच जनतेला योग्य तो न्याय मिळू शकेल असा दावा श्री. दाभोलकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!