*कोंकण Express*
*कणकवली पोलिसांनी हरवलेले ६९ मोबाईल केले मूळ मालकांना परत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेल्या दहा महिन्यात कणकवली तालुक्यातील नागरिकांचे ६९ मोबाईल प्रवासा दरम्यान हरवले होते. हे सर्व मोबाईल सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून परत मिळविण्यात कणकवली पोलिसांना यश आले आहे. यात जुलै महिन्यात हरवलेले १२ मोबाईल आज येथील पोलीस ठाण्यात मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल शोधामध्ये पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांनी दमदार कामगिरी बजावली.
कणकवली पोलीस ठाण्यात आज पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्याहस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलिस विनोद चव्हाण, प्रशांत कासले आदी उपस्थित होते.
गेल्या दहा महिन्यात कणकवली पोलीस ठाण्यात ६९ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांनी
सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून या हरवलेल्या सर्व मोबाईलचा छडा लावला. महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड,
कर्नाटक आदी राज्यात हे हरवलेले मोबाईल कार्यरत असल्याचे सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून दिसून आले होते. या मोबाईल
वापरकर्त्यांशी संपर्क साधून हे मोबाईल कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात पोलीसांना यश आले. एकूण ६९ गहाळ मोबाईल पैकी ५७
मोबाईल यापूर्वीच मूळ मालकांना देण्यात आले होते. तर जुलै महिन्यात हरवलेले १२ मोबाईल आज मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात
आले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले यांचे कौतुक करण्यात आले.

